मणिपूर (वृत्तसंस्था) मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिग अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि काही जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात कर्नलसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आला.
मणिपूरमध्ये ४६ आसाम रायफल्सच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ४६ आसाम रायफल्सचे कर्नल विप्लव त्रिपाठी त्यांची पत्नी व मुलाचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जवान देखील शहीद झाले आहेत. मागील अनेक वर्षांमधील या क्षेत्रात झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या सेहकेन जिल्हा मुख्यालयाच्या चुराचांदपूर पासून जवळपास ६५ किलोमीटर लांब बेहियांग क्षेत्रातील म्यानमार सीमेवरील गावाजवळ ही घटना घडली आहे. शनिवार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी लक्ष ठेवून हा हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी ट्विट करुन या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
हल्ल्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेसाठी ऑपरेशन सुरु केले आहे. या हल्ल्याच्या मागे, दहशतवादी संघटना पीपुल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ला जबाबदार मानले जात आहे. १९७८ साली बिश्वेसर सिंह यांनी या संघटनेची सुरुवात केली होती. पुढे जावून भारत सरकारने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. स्वतंत्र मणिपूरच्या मागणीसाठी ही संघटना प्रामुख्याने ओळखली जाते.