कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) परिसरातील वनकोठा गावात पॉलीशच्या बहाण्याने भरदिवसा ६० हजाराचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मागील जिल्ह्यात दोन महिन्यापासून ग्रामीण भागात पॉलीशच्या बहाण्याने दागिने लांबविण्याचे प्रकार वाढले आहेत. (Jalgaon Crime News)
दोन भामट्यांनी गंडवले !
नागेश्वर शेनफडू पाटील (वय ३०,रा. वसंत सहकारी साखर कारखाना,वनकोठे ता. एरंडोल) हे हे एमएसईबीमध्ये (MSEB) ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ११ : ३० च्या दरम्यान, दोन अज्ञात इसमांनी आम्ही दागिने पॉलीश करून देत असल्याची बतावणी केली. यावर विश्वास ठेऊन नागेश्वर पाटील यांनी आपल्या आईचे १६ हजार किंमतीचे पावणे चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या फॅन्सी रिंगा, १२ हजार किंमतीचे तीन ग्रॅम वजनाची मनी पोत त्यात दोन ग्रामचे पॅन्डल व एक ग्रॅम मनी, १२ हजार रुपयांची तीन ग्रॅम वजनाचे कानातले लटकन आणि २० हजार रुपयाचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील काप असा एकूण एकूण ६० हजार रुपयांचे दागिने पॉलीशसाठी दिलेत. परंतू अज्ञात भामट्यांनी दिशाभूल करून नागेश्वर पाटील यांची फसवणूक केली. या प्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोहेकॉ युवराज कोळी हे करीत आहेत.
दोन महिन्यातील तिसरी घटना !
दि. २२ डिसेंबर रोजी रोजी पॉलिश करण्याच्या बहाण्याने १ लाख ६० हजार रुपये किमंतीची ४ तोळ्यांचे दागिने लांबवल्याची घटना चोपडा तालुक्यातील आखतवाडे गावी घडली होती. यानंतर दि. ११ जानेवारी चोपडा तालुक्यातीलच मोहरद गावात ४० हजाराची सोन्याची मंगल पोत पॉलीश करुन देतो म्हणून डिगंबर तुकाराम शेवरे (वय ३८) आणि ईश्वर नारायण शिंदे (वय ४०, दोघं रा. ओझर ता. जामनेर) या दोघांनी लंपास केली होती. यानंतर आता कासोदा येथे अशीच घटना घडल्यामुळे जिल्ह्यात दागिने पॉलीशच्या बहाण्याने ठगवणाऱ्यांची टोळी फिरतेय का ?, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. तसेच ही एकच टोळी असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.