जळगाव (प्रतिनिधी) अंगझडती घेण्याच्या वादातून जिल्हा कारागृह मधील कैद्यांने पोलिसांवर धारदार वस्तुने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे यानंतर कैद्याने स्वत:हून त्याच्या हातातील धारदार वस्तुने त्याच्या डोक्यात किरकोळ स्वरुपात दुखापत करून घेतली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा केला आहे म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन दशरथ सैंदाणे असं आरोपी कैद्याचं नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राहुल राम घोडके (वय २९, नोकरी – सबजेल पोलीस शिपाई, रा. दिवेगांव ता. रेणापुर जि. लातूर) हे आपले सहकारी सुभाष खरे, कुलदीप दराडे, निवृत्ती पवार, निलेश मानकर, रामचंद्र रोकडे, सीताराम हिवाळे या सहकाऱ्यांसह नेहमीप्रमाणे कैद्यांची अंगझडती घेत होते. यावेळी न्यायालयीन बंदी असलेला सचिन दशरथ सैंदाणे यांनी पोलिसांसोबत वाद घालायला सुरुवात केली. सचिन सैंदाणे याने अंग झडती देण्यास विरोध केला. तसेच अरेरावीची भाषा करुन शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर पोलिसांना धक्काबुक्की करुन दुर लोटत त्याच्या जवळील धारदार वस्तूने मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस शिपाई घोडके यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी सचिनला अडवले असता त्याने स्वत:हून त्याच्या हातातील धारदार वस्तुने स्वत:च्या डोक्यात किरकोळ स्वरुपात दुखापत केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि प्रदिप चांदेलकर हे करीत आहेत.
















