धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावकडून चोपडाकडे जात असतांना मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात पिता आणि मुलगी जागीच ठार झाले असून पत्नी व मुलगा जखमी झाले आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की १८ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास धरणगाव हून चोपड्याच्या दिशेने पती-पत्नी हे आपल्या दोन अपत्यांसह मोटरसायकलने जात होते. रोटवद गावाजवळ अंधारात बैलगाडी न दिसल्याने दुचाकीची बैलगाडीला मागून जोरात धडक दिली. या अपघातात चालक प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी ( वय ३५ वर्ष, रा. पिंपळगाव तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे) तसेच मुलगी नायरा प्रभाकर सूर्यवंशी (वय वर्ष ७) ही बाप-लेक जागीच ठार झाले. तर पत्नी ममता रघुनाथ सूर्यवंशी व मुलगा मोहित प्रभाकर सूर्यवंशी हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच धरणगावचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक माहिती घेतली. तसेच जखमींना लागलीच धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मयतांचे शवविच्छेदन रात्री उशिरा पर्यंत होणार असल्याचे कळते. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हापर्यंत धरणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली नव्हती.
















