धरणगाव (प्रतिनिधी): धरणगाव तालुक्यातील बाभळे बु. परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे. दि. १७ नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल १६ ते १७ शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींवरील इलेक्ट्रिक मोटारीच्या आणि सोलर पंपाच्या वायरी (केबल) कापून नेल्या आहेत.विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांत चोरीची ही दुसरी मोठी घटना असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
शिवसेना उपनेत्यांच्या उपस्थितीत तक्रार
या घटनेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, भानुदास पाटील आणि लक्ष्मण माळी धावून आले. त्यांनी पीडित शेतकऱ्यांसोबत धरणगाव पोलीस स्टेशन गाठून या चोरीच्या सत्राचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे आपल्या व्यथा मांडल्या .
या बाधित शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान
या चोरीच्या सत्रात अनेक शेतकऱ्यांच्या उपकरणांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने ज्ञानेश्वर रावा माळी यांच्या बोअरवेल व विहिरीवरील सोलरच्या केबल व स्टार्टर युनिट चोरीला गेल्या.
सोबतच नवल हरी माळी, अंकुश पाटील, भगवान पाटील, शालिक पाटील, वाल्मीक पाटील, अरुण पाटील, योगेश पाटील, गोकुळ पाटील, कैलास पाटील, बापू माळी, दीपक माळी, नामदेव पाटील व इतर शेतकऱ्यांच्या केबल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
पोलीस प्रशासनाकडून तपासाचे आश्वासन
घटनेची गांभीर्याने दखल घेत धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार साहेब यांनी तातडीने बाभळे बु. शिवारात जाऊन चोरी झालेल्या स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. ऐन हंगामात झालेल्या या चोरीमुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला असून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पोलीस निरीक्षक पवार यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून चोरट्यांना जेरबंद करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.
















