जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या दाखल गुन्ह्यात निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या अटकेसाठी जिल्हा पेठ पोलिसांचे एक पथक पुन्हा एकदा ठाण्याला रवाना झाले असून पोलिसांचे हे पथक तीन दिवसापासून ठाण्यातच ठाण मांडून असल्याचे कळते.
पोलिसांचे पथक तीन दिवसापासून ठाण्यातच ठाण मांडून !
अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर एक सहायक निरीक्षक व तीन कर्मचारी अशा चार जणांचे पथक बकाले यांच्या मागावर आहे. या आधी दोन्ही वेळा बकाले घरी मिळून आले नाहीत. अगदी ठाण्याच्या घरी त्यांच्या पत्नीच्या हातात पोलिसांनी नोटीस दिली होती. परंतू त्यांच्याकडून नोटीस घेण्यासही त्यांनी नकार दिला होता. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पुन्हा एक पथक रवाना झाले असून ते तीन दिवसापासून ठाण्यातच ठाण मांडून आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या ४० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे नोंदविले जबाब !
स्थानिक गुन्हे शाखेत निरीक्षक पदावर असताना बकाले यांनी त्यांच्याच कार्यालयातील सहायक फौजदार अशोक महाजन यांच्याशी मोबाइलवर बोलताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर चौकशी सुरु झाली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले जात आहेत. आतापर्यंत ४० पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत.
या आठवड्यात चौकशी पूर्ण होणार
ऑडीओ क्लीपमधील दुसरी व्यक्ती अशोक महाजन यांनाही नोटीस बजावण्यात आली असून, चौकशीकामी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे अशोक महाजन यांनी टपालाने खुलासा पाठविला आहे. दरम्यान, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा हे या आठवड्यात चौकशी पूर्ण करून विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे अहवाल सादर करणार आहेत.
















