बीड (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जमावाने लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्र वापरून तीन सख्ख्या भावांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन भावांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत. या खळबळजनक घटनेने परिसरात तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मयत भावांची नावे भरत विलास भोसले आणि आदिनाथ विलास भोसले आहेत, तर गंभीर जखमी कृष्णा विलास भोसले याच्यावर उपचार सुरू आहेत. अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील या घटनेनंतर पोलिसांनी ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
हातोळण (ता. आष्टी) येथील आदिनाथ विलास भोसले, भरत विलास भोसले आणि कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ गुरुवारी वाहिरा गावात आले होते. या ठिकाणी गावातील आणि बाहेरील काही लोक एकत्र जमले होते, आणि ते सर्वजण दुपारीपासून तेथेच होते. रात्री १० वाजेच्या सुमारास काही लोकांनी या तीनही भावांवर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात आदिनाथ विलास भोसले आणि भरत विलास भोसले या दोन्ही सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेप्रकरणी अंभोरा पोलिसांनी ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र, हल्ल्याचे कारण आणि त्याचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठा शोक आणि आक्रोश माजला आहे. मयतांच्या कुटुंबातील महिलांचे हुंदके आणि आक्रोश पाहून उपस्थित देखील भावूक झाले. घटनेच्या स्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, बाबासाहेब गजें, मनोजकुमार खंडागळे, भरत माने, बाबुराव तांदळे, लुईस पवार, दत्तात्रय टकले, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे आणि अमोल शिरसाठ यांनी भेट दिली. पोलिसांनी जुन्या वादामुळे हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला आहे.
बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. वाहिरा (ता. आष्टी) येथे दोन सख्ख्या भावांचा जमावाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याआधीच जिल्ह्यातील संवेदनशील परिस्थिती, त्यात अंबाजोगाई येथील व्यापाऱ्यावर झालेला प्राणघातक हल्ला, मोरेवाडीतील गोळीबार आणि आता वाहिरा येथील दोन्ही सख्ख्या भावांचा खून यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे वातावरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपास पथके घटनास्थळी रवाना केली असून संशयितांना ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केली आहे.