जळगाव (प्रतिनिधी) सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा बँक संचालक संजय पवार यांना नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या शैक्षणिक दिवसानिमित्त राजभवन मुंबई येथे दि. ७ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन गौरविले. हा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील शेती व सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक, जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन, जळगाव जिल्हा सहकारी बोर्डाचे विद्यमान संचालक यांना देण्यात आला. सहकार क्षेत्रामध्ये आपल्या भागामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संजय मुरलीधर पवार यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. सदरचा पुरस्कार मुंबई येथे राज्यपाल यांच्या हस्ते देण्यात आला. संजय पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्याचे काम केले आहे.