धरणगाव (प्रतिनिधी) येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेतर्फे भिल्ल जनजातीचा सामुहिक विवाह सोहळा आनंदी वातावरणात व जल्लोषात संपन्न झाला. यावेळी परिसरातील ३५ जोडपे विवाहबद्ध झाले. एन. बी. कॉटेक्स (कॉटन जीनींग) परीसर या निमित्ताने गजबजून गेला होता. यगायत्री परिवाराच्या ४० महिला सेवेकरी व संचालन करणारे गुरुजींनी संगीतमय मंत्रोच्चाराने विधी केला.
या प्रसंगी पू. संत महामंडलेश्वर १००८ ह.भ.प. भगवानबाबा धरणगाव, योगी हिरानाथ महाराज शितलनाथबाबा मठ गोरगावले,मा. खानदेशभूषण रुपचंद महाराज औरंगपूर, योगी मंगलनाथ महाराज बदरखे मारुती मंदिर टोळी, प्रकाश महाराज नारायणी आश्रम, राधाकृष्ण मंदिर सत्रासेन हड्सन महाराज, नरवाडे, लोटन महाराज आडगाव आश्रम तसेच विभाग संघचालक राजेश आबा पाटील, तालुका संघचालक मोहन चौधरी, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी आ.राजूमामा भोळे तसेच धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताड उपस्थित होते.
महावीर प्रसाद तापडिया संचालक, सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव, सत्यनारायण डागा, मनोज डागा यांच्या प्रेरणेने हा सोहळा संपन्न झाला. हरीशभाई जानी यांनी आपली जीन सर्व सुविधांसह उपलब्ध करून दिली तसेच प्रत्येक नवरदेव व नवरीस ड्रेस व साडी सप्रेम भेट दिली. संस्थेतर्फे विवाह नोंदणीच्या वेळेसच नवरदेवास दोन ड्रेस, ड्रेस शिलाई साठी पैसे, बूट व दहा हजार रुपये चेक द्वारा मदत देण्यात आली. नवरीस महावस्त्र, शिलाई साठी पैसे, चप्पल, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची नथ, चांदीच्या साखळ्या व बेले तसेच पाच हजार रुपयांची मुदत ठेव पावती देण्यात आली. नवदांपत्यांना संसारोपयोगी वस्तूंचेही वाटप करण्यात आले.
समितीचे प्रमुख सोमनाथ भिल, सदस्य अरुण सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे, उपाध्यक्ष यशवंत कुवर व संस्थेचे पदाधिकारी सुखदेव सोनवणे, संजय महाराज सोनवणे, शिवदास भिल, प्रभाकर वाघ व शांताराम जाधव आदींनी विवाह जुळवण्या संदर्भात गावोगावी वस्तीमध्ये संपर्क करून अथक परिश्रम घेतले. अशे सोहळे हे काळाची गरज असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.