जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेविरुद्ध दोषारोप पत्र काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले आहे. या दोषारोप पत्रातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानुसार मालमत्ता विकण्यासह इतर गोष्टींमुळे ‘बीएचआर’मध्ये झालेल्या अपहाराची एकूण अपहृत रक्कम तब्बल १६७ कोटी १५ लाख ६७ हजार १३१ रुपये एवढी असल्याचे पोलीस तपासून समोर आले आहे.
बीएचआर पतसंस्थेत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यातील डेक्कन, आळंदी व शिक्रापुर या तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. यातील डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल गुन्ह्यात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेविरुद्ध दोषारोप पत्र नुकतेच दाखल करण्यात आले आहे.
कंडारेविरुद्ध दोषारोप पत्रातून याआधी कर्जामध्ये वर्ग केल्यामुळे तब्बल १२१ कोटी २३ लाख ४४१ कोटींचा एकूण तोटा झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. तर आता मालमत्तेचे कमी मुल्यांकनासह ठेवीदारांच्या ठेवी वर्ग करून मालमत्ता विकल्यामुळे झालेला तोटा, महावीर जैन यास फी म्हणून दिलेली रक्कम, कुणाल शहा यास फी म्हणून दिलेली रक्कम आणि वेगवेगळ्या आस्थापनांना संशयास्पदरित्या वर्ग केलेल्या रक्कमेचा समावेश आहे. यानुसार एकूण अपहारीत रक्कम तब्बल १६८ कोटी १५ लाख ६७ हजार १३१ रुपयाच्या घरात आहे.
डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीत १६ लाख ९० हजार १४५ रुपयांचा अपहार झाल्याचे म्हटले होते. परंतू पोलीस तपासात आता अपहाराची रक्कम दीडशे कोटीहून अधिकच्या घरात गेली आहे. यानुसार फिर्यादीमध्ये नमूद रक्कम १६,९०,१४२, पतसंस्थेचे कर्जामध्ये ठेवी वर्ग केल्यामुळे झालेला तोटा १,२१,२३,१२,४४१, मालमत्तेचे कमी मूल्यांकन करून व ठेवीदारांच्या ठेवी वर्ग करून मालमत्ता विकल्यामुळे झालेला तोटा ४३,७१,४०,९६१, महावीर जैन यास फी स्वरूपात दिलेली रक्कम ७,६७,०००, कृणाल शहा यास फी स्वरूपात दिलेली रक्कम ८२,३४,२६०, वेगवेगळ्या आस्थापनांना संशयास्पदरित्या वर्ग केलेली रक्कम १,१४,२२,३२७ इतकी आहे. तर एकूण उपहारीत रक्कम १,६७,१५,६७,१३१ एवढी आहे.
विजय वाघमारे (9284058683)