जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेत तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलिस पथकाने धाड टाकून जप्त केलेल्या १२८ ठेवीदरांच्या मूळ पावत्या परत करण्याचे पुणे जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने आदेश दिला आहे.
जनसंग्राम ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांना सुद्धा या गुन्ह्यात इतरांसह संशयित म्हणून अटक झाली होती. त्यावेळी त्यांच्या घरातून पोलिसांनी १२८ ठेवीदारांच्या मूळ पावत्या आणि केवायसी कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. ठेवींच्या पावत्या कर्जदारांना कमीशनवर विकणे,अवसायक यांच्याशी लागेबांधे असणे आणि दलालांशी हातमिळवणी करून ठेवीदारांची फसवणूक करणे आदी आरोप ठेवून विवेक ठाकरे यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रात नमूद होते. त्यानंतर गेल्यावर्षी ३ ऑगस्ट रोजी ठाकरे यांचा जामीन झाला होता.त्यानंतर मार्च ते मे महिन्यात पोलिसांनी जप्त केलेल्या १२८ ठेवीदारांपैकी ३२ ठेवीदारांनी मूळ पावत्या परत करण्याचे पोलिसांना आदेश व्हावेत म्हणून पुण्याच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयात ॲड.प्रवीण कोल्हे यांच्यावतीने अर्ज दाखल केले होते.
दरम्यान,बीएचआर संस्थेचे अवसायाक चैतन्य नासरे यांनी अधिकारपत्र देवून व्यवस्थापक प्रमोद माळी यांच्यावतीने सुद्धा संस्थेमधील जप्त कागदपत्रे, लॅपटॉप,हार्डडिस्क आदी साहित्य आणि संशयित आरोपी विवेक ठाकरे यांच्या घरातील १२८ ठेवीदारांच्या मूळ पावत्या परताव्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड.प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत ९ मे रोजी अर्ज केला होता. त्यावर ५ जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती एस.जे.भरुका यांनी आदेश पारित करून १२८ ठेवीदारांच्या मूळ ठेव पावत्या आणि संस्थेतील जप्त इतर साहित्य देण्याचे तपासाधिकारी यांना आदेश दिले आहेत.या आदेशामुळे संस्थेचे लॅपटॉप व हार्डडिस्क मिळाल्याने डाटा रिकव्हर होवून कर्जवसुलीला आणि पर्यायाने ठेवी परताव्याला गती मिळणार आहे.
कमीशनवर पावत्या विकल्या नव्हत्या हे सिद्ध झाले : विवेक ठाकरे
बीएचआर संस्थेच्या तत्कालीन चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्या मनमानी कारभारविरोधात २००९ पासून तक्रारी करत होतो.२०१४ मध्ये संस्था १६ हजार कोटींच्या बेनामी ठेवींच्या मुद्द्यामुळे अडचणीत आल्यानंतर प्रारंभापासून ठेवी परत मिळाव्यात या भूमिकेने राज्यभरातील ठेवीदारांना एकत्र करून काम करत होतो. सुरुवातीला तत्कालीन चेअरमन यांनी ८०-२० टक्क्यांचा जाहीर केलेला फार्मुला हाणून पाडण्यापासून तत्कालीन चेअरमन व संचालकांवर तब्बल ८२ ठिकाणी गुन्हे दाखल करणे,संचालकांना मध्यरात्री अटक करायला पोलिसांना भाग पाडणे, अवसायक नेमणूक, अवसायकांना घेराव,ठेवीदारांना १०० टक्के व्याजासहित ठेवी मिळाव्यात,संचालकांच्या कार्यकाळातील गैरव्यवहाराचे ऑडिट होवून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, ठेवीदारांनी दाखल केलेले गुन्हे एकत्रित न करता त्या-त्या न्यायालयातच चालवावे आदी मागण्यांवर काम करून व्हिसल ब्लोअर कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अनेकांना माझी अडचण झाल्यानेच राजकीय कुरघोडीतून माझा काही एक संबंध नसतांना डेक्कन पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यात मला गोवण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास आता सीआयडीकडे असल्याने पुढे काय ते सिद्ध होईलच.तरीही गुन्ह्याच्या धाडीवेळी माझ्या घरात ज्या १२८ ठेवीदारांच्या पावत्या जप्त झाल्या होत्या त्यांची कुणाचीही माझ्याविरोधात तक्रार नव्हती. त्यामुळे मला जामीन तर मिळालाच शिवाय सर्व १२८ ठेवीदारांच्या पावत्या जशाच्या तशा असल्याने परत करण्याचे पोलिसांना मे.कोर्टाचे झालेले आदेश म्हणजे मी या पावत्या कमीशनवर किंवा दलाल म्हणून मॅचिंग केलेल्या नव्हत्या हेच सिद्ध होत आहे. अवसायक यांनी कोर्टात सुमोट्यू अर्ज दाखल केल्याने या सर्व १२८ ठेवीदारांना दिलासा मिळणार असल्याचा आनंद आहे.
– विवेक ठाकरे (संशयित आरोपी आणि अध्यक्ष,जनसंग्राम ठेवीदार संघटना )