जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील राजगुरूनगर पुणे, शिवाजीनगर पुणे, इंदापूर पुणे, तळेगांव दाभाडे पुणे, व पाचोरा या शाखेतील अपहार प्रकरणात आज न्यायालयात प्रमोद रायसोनी यांच्यासह १४ संचालकांना आरोप वाचून दाखवण्यात आले. यावेळी सर्व संचालकांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले. दरम्यान, या पाच गुन्ह्यातील अपहाराची रक्कम तब्बल १५ कोटीच्या घरात असल्याचे समोर आले आहे.
राजगुरूनगर पुणे, शिवाजीनगर पुणे, इंदापूर पुणे, तळेगांव दाभाडे पुणे, व पाचोरा या शाखेतील गैरव्यवहाराबाबात दाखल असलेल्या सात गुन्ह्यांमध्ये प्रमोद रायसोनी याच्यासह १४ संचालकांवर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र मागील महिन्यात सादर करण्यात आले होते. जिल्हा कारागृहात बंदी असलेले संचालक प्रमोद रायसोनीसह १४ जणांना आज व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर असलेले आरोप न्यायालयाने त्यांना वाचून दाखवले. त्यावर सर्व आरोपींनी आरोप फेटाळून लावले. बीएचआर प्रकरणी आज एकूण ५ खटल्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या १४ आरोपींवर सीआयडीने दाखल केलेल्या चार्जेशीट नंतर खटला सुरू होण्यासाठी आरोप ठेवण्यात आला होता. यात राजगुरूनगर पुणे, शिवाजीनगर पुणे, इंदापूर पुणे, तळेगांव दाभाडे पुणे, व पाचोरा या शाखेतील गैरव्यवहाराबाबात असून यात अनुक्रमे २,३०,००,००० /, ०७,०५,०६,६७०/, ४,७७,९३,३९४/, ४०,५७,३०० व ८९,१८,३३८ असा एकूण १५ कोटी ४२ लाख ७४ हजार ७०२ रुपयाचा अपहार आहे. सदरचे खटले न्या.आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात सुरू असून सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके तर संशयितांतर्फे अॅड. अकील इस्माईल हे काम पाहत आहे.
दरम्यान, बीएचआर प्रकरणी राज्यभरातील ८१ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यात अमरावती, परभणी, लातुर, सांगली, लातुर व पुण्यात येथे दाखल सात गुन्ह्यांचा देखील समावेश असून जळगाव न्यायालयात या गुन्ह्यात दोषारोप सादर झालेले आहेत. बीएचआरमधील अपहार प्रकरणात राज्यभरात दाखल असलेल्या गुन्ह्यांची सुनावणी जळगाव न्यायालयात सुरु आहे.