जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनवाई सुरु आहे. बचाव पक्षाने आपली बाजू मांडल्यानंतर आज सरकार पक्षाने झंवर याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.
साधारण नऊ महिने पोलिसांना गुंगार दिल्यानंतर सुनील झंवरला १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. पुणे न्यायालयात सुनील झंवरने जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर झंवरच्या वकिलांनी आपला नुकताच युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला होता. त्यानंतर आज सरकार पक्ष आपले म्हणणे सादर केले. विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी सुनील झंवरच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. यावेळी अॅड.चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्ह्याची संपूर्ण पार्श्वभूमी देखील सांगितली. त्यानंतर न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपली. त्यामुळे आता मंगळवारी झंवरच्या जामीन अर्जावर उर्वरित युक्तिवाद सरकार पक्ष मांडणार आहे.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे या दोघांनी पोलिसांना चांगलाच गुंगार दिला होता. दोघांनी बेपत्ता असल्याच्या काळात बहुतांश वेळ इंदूर (मध्यप्रदेश) येथे घालवला होता. सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर त्याने पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण येत वॉरंट रद्द केले असून त्याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला मिळवून घेतला होता. दरम्यान, यापूर्वी झंवरचे अटकपूर्व जामीन अर्ज अनेकदा फेटाळून लावण्यात आलेले आहेत.