जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनवाई सुरु आहे. झंवरला जामीन मिळवा यासाठी त्याच्या वकिलांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरु आहे.
साधारण नऊ महिने पोलिसांना गुंगार दिल्यानंतर सुनील झंवरला १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तत्पूर्वी २८ जून रोजी जितेंद्र कंडारे याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, पुणे न्यायालयात सुनील झंवरने जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज झंवरच्या वकिलांनी आपला युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला. उद्या (बुधवारी) देखील झंवरची वकील युक्तिवाद सादर करणार आहेत. त्यानंतर सरकार पक्ष आपले म्हणणे सादर करणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या या दोघांनी पोलिसांना चांगलाच गुंगार दिला. परंतू दोघांनी बेपत्ता असल्याच्या काळात बहुतांश वेळ इंदूर (मध्यप्रदेश) येथे घालवला होता. सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर त्याने पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण येत वॉरंट रद्द केले असून त्याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला मिळवून घेतला होता.
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर पाच मार्चला पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण आला. त्यानंतर त्याने फरार घोषित होण्याचे वॉरंट रद्द करून घेतले होते. दुसरीकडे मात्र, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मुंबई, मध्य प्रदेश, दिल्ली आणि गुजरात सारख्या राज्यामध्ये सुनील झंवरचा कसून शोध घेत होती. परंतू अखेर त्याला नाशकात सापळा रचून अटक करण्यात आली होती. झंवरला पंचवटी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. परंतू कायदेशीर प्रक्रीया पुर्ण केल्यांनतर त्याला पुण्याला हलवण्यात आले होते.