जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित कुणाल शहा याचा अटकपूर्व जामीन आज न्यायालयाने फेटाळून लावला. तर दुसरीकडे धरम सांखलाच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद आज पुर्ण झाला. कुणाल शहावर ‘बीएचआर’ची अधिकृत वेबसाईट असतांना बनावट सॉफ्टवेअर तसेच वेबसाईट तयार करून दिल्याचा आरोप आहे.
संशयित आरोपी विवेक ठाकरे, सुजित वाणी व महावीर जैन यांच्या जामीन अर्जांवरील युक्तीवाद पुर्ण झाले आहेत. त्यावर गुरुवारी (२१ जानेवारी) निकाल येणार आहे. तर धरम सांखलाच्या जामीनावर शुक्रवारी (२२ जानेवारी) रोजी न्यायालय निकाल देणार आहे. या प्रकरणी पुण्यातील विषेश न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात या सुनावणी सुरू आहेत.
दरम्यान, जितेंद्र कंडारे यांनी आरोपी कुणाल शहा या अहमदाबादच्या व्यक्तीशी कुठे कशी व कोणामार्फत भेट केली ? त्याचेशी संगणमत करून बनावट वेबसाईट तयार केली तसेच या बनावट वेबसाईटव्दारे कोणकोणत्या संस्थेच्या मालमत्ता विक्री करावयाचे भासवायचे याबाबत कोठे वैठका झाल्या व त्यात या आरोपी व्यतिरिक्त अजून कोण सहभागी होते हे आरोपी धरम साकला, विवेक ठाकरे, महावीर जैन, सुजित वाणी यांच्याकडे सखोल तपास करून जाणून घ्यावयाचे आहे. तर कुणाल शहा नावाच्या व्यक्तीकडून नवीन सॉफ्टवेअर तयार करून त्यात पाहिजे त्यावेळी मागील तारखेचे अथवा हवा तसा बदल करून या आरोपींनी गैरव्यवहार केला, याबाबत पोलिसांनी संबंधितांकडे चौकशी केलेली आहे. तर पोलीस तपासात असे निष्पन्न झालेय की, बीएचआर संस्थेच्या मालमत्ता विक्रीसाठी २ अधिकृत वेबसाईट अस्तीत्वात असताना आरोपींतांनी बनावट खाजगी वेबसाईट कुणालाही कळू नये म्हणून अहमदाबादच्या कुणाल शहा या व्यक्तीकडून संगणमताने तयार केली होती. या बनावट वेबसाईटव्दारे सदर संस्थेच्या मालमत्ता विक्री केल्याचा खोटा देखावा निर्माण करून संस्थेच्या करोडो रूपयांच्या मालमत्तेचा विक्रीच्या नावाखाली अपहार केला होता.