जळगाव (प्रतिनिधी) सीए महावीर जैनने आपल्या लेखापरिक्षणात अवसायकाने पतसंस्थेच्या ज्या ७ मालमत्ता विक्री केल्या, त्या पतसंस्थेने किती किंमतीला खरेदी केल्या होत्या?, याबाबत कोणतीही माहीती रेकॉर्डवर घेतली नाही. सदर मालमत्ता या महत्त्वाच्या बाजारपेठेच्या ठिकाणी होत्या. तसेच या मालमत्ता बाजारभावाप्रमाणे अधिक किंमतीला विकता आल्या असत्या. तरी देखील याबाबतचा आपला अभिप्राय रेकॉर्डवर घेतला नाही. एवढेच नव्हे तर, लिलाव प्रक्रियेदरम्यान सर्व लिलावाकरीता ठरावीक निवीदाधारकच असल्याबाबतचा उल्लेखही हेतुपुरस्कर टाळला. प्रत्येक लिलावासाठी तीन किंवा चारच लोकांनी निवीदा भरलेल्या दिसून येत असतानाही केवळ सदर निवीदाधारक हे संशयित आरोपी किंवा त्यांच्या हितसंबंधातील लोक असल्याने याबाबत महावीर जैन याने जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर अपहार उघड होवू नये, म्हणून त्यासर्व बाबीचा उल्लेख आपले लेखापरिक्षणात केला नाही, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
संशयित आरोपींच्या गैर कारभाराला प्रोत्साहन
पोलीस तपासानुसार महावीर जैनने मल्टिस्टेट को. ऑप सोसायटीतील नियम २९ चा जाणिवपूर्वक उल्लेख केलेला नाही. अनेक ठेवीदारांच्या तक्रारीचा उल्लेख केलेला नाही. टेंडरमध्ये आलेल्या अनेक तक्रारीचा उल्लेख केलेला नाही. मल्टिस्टेट को. ऑप. अॅक्ट कलम ९० व रुल २९ नुसार अवसायनात गेलेल्या पतसंस्थांच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम समान तत्वाने वाटप करणे आवश्यक असताना ठेवीदारांच्या ठेवी २० ते ३० टक्के रक्कम देतो असे अमिष दाखवुन घेवुन त्या कर्जदारांच्या कर्जखाती निल करणेसाठी व लिलावप्रक्रियेत मालमत्ता खरेदीसाठी वापर करून ठेवीदारांना पुर्ण पैसे दिले, अशी नोंद पतसंस्थेच्या रेकॉर्डमध्ये केली गेली. याबाबत ऑडिट रिपोर्टमध्ये हेतूपुरस्सर नोंद न घेता इतर संशयित आरोपींच्या गैर कारभाराला प्रोत्साहन देवून आपले कायदेशिर कर्तव्य टाळले आहे. कर्जप्रकरणामध्ये ठराविक ठेवीदारांच्या ठेवी बेकायदेशिररित्या मॅचिंग केल्यामुळे त्यांना काहीप्रमाणात पैसे मिळाले. परंतु इतर ठेवीदारांना अजिबातच रक्कम न मिळाल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला. याचा देखील महावीर जैनने आपले ऑडीट रिपोर्टमध्ये उल्लेख केलेला नाही.
ठेवी कर्जामध्ये बेकायदेशीररित्या वळत्या केल्या
यापूर्वी पतसंस्थेच्या ऑडिटचे काम केलेले सीए धरम सांखला यांनी स्वतःचे नावे रु. १,५०,००,०००/ एवढे पैसे कर्जाच्या नावाखाली मंजुर करुन घेवुन त्यापैकी ७८,५०,०००/ इतक्या कर्जाचा लाभ घेतला आहे. तसेच त्यांची आई सुनंदा किशोर सांखला या वयस्कर असताना व त्यांना उत्पन्नाचे ठोस साधन नसतांना त्यांच्या नावे कर्जाच्या नावाखाली रक्कम रु. ३,१०,००,०००/- अशी दोन टप्प्यात वळते करून घेतली आहे. या सर्व थकित रक्कमेतील रु. ४,४९,४१,०८५/ परतफेड केली असून त्यापैकी रु. ३,५९,८१,०८५/ इतकी रक्कम ठेवीदारांच्या ठेवी कर्जामध्ये वळत्या करुन बेकायदेशिररित्या भरले.
बेकायदेशिर कृत्ये कायदेशिर ठरविली
याचप्रमाणे इतर कर्जधारकांची कर्ज प्रकरणे मोठया प्रमाणात होती, सदरची कर्ज प्रकरणे अशाप्रकारे कि कर्जाच्या नावाखाली ठेवी मॅच करुन निल केलेली आहे. ही बाब बेकायदेशीर असुनही त्याबाबत विशेष भाष्य केलेले नाही. महावीर जैन यांनी कंडारे यांचे कर्जात ठेवी जमा करण्याचे बेकायदेशिर कृत्य, मालमत्ता विक्रीची पूर्ण रक्कम वसूल न करता तेथील ठेवी जमा केल्या. या सर्व बाबी अवसायक यांच्या अधिकरातील आहे, असे जाणीवपूर्वक खोटे निष्कर्श नोंदवुन जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर, योगेश लढढा, धरम सांखला यांची बेकायदेशिर कृत्ये महावीर जैन आणि विकास चोरडीया यांनी कायदेशिर ठरविली, असे देखील तपासात समोर आले आहे.