जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावून ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा आज पुणे ठेवीदार संघर्ष समितीकडून सत्कार करण्यात आला. यावेळी उपायुक्त भाग्यश्री नवटके, पो.नि. सुचेता खोकले आणि संदिप भोसले यांना ठेवीदार संघर्ष समितीने पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. दरम्यान, पो.नि. खोकले यांची बदली रद्द करण्याची मागणी देखील ठेवीदार संघटनेने केली आहे.
बीएचआर घोटाळ्यात घोटाळेबाजांना पकडून तुरूंगात टाकणे. फसवेगिरी करणाऱ्यांना न्यायालयामार्फत कर्ज वसुलीचे सरकारी वकीलांमार्फत आदेश पारीत करून घेणे, अशा प्रकारची केलेली कामे ठेवीदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत. म्हणून हजारो ठेवीदारांच्यावतीने आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके, पो.नि. सुचेता खोकले, संदिप भोसले आणि सर्व अधिकारी वर्गाचे ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने आज अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष डी.ए.दाभाडे, रामचंद्र फिरके, रमेश मुंगसे, दिनकर भोगाडे, दिपा गुरनानी व कांचन खटावकर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नवीन अवसायक श्री.नासरे साहेब यांना डेटा इमेज हार्ड डिस्कची कॉपी मिळाल्या शिवाय ते कोणतेही काम करू शकत नव्हते. ते मिळण्यासाठी म्हणून समितीमार्फत विनंती निवेदन देण्यात आले. त्यावर नवटके मॅडम यांनी संबंधित हार्ड डिस्क पुढील आठवड्यात श्री.नासरे यांना पुण्याला बोलावून देणार असल्याचे सांगितले. तसेच ठेवीदार संघटनेने आपल्या लेटरहेडवर तपासाधिकारी सुचेता खोकले यांची बदली रद्द करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देखील दिले आहे. तसेच ठेवीदारांचे पैसे लवकर मिळावे, अशी विनंती देखील संघर्ष समितीच्या वतीने उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडे करण्यात आली.