जळगाव (प्रतिनिधी) पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला बीएचआर घोटाळ्याच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. त्यानुसार अॅडव्हरटायझींग कंपनी, पेस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्व्हेस्टिगेशन आणि सर्व्हिसेस आणि सेल्फ चेक असे एकूण सहा आस्थापनांना १ कोटी ८६ लाख ७२ हजार ४९२ रुपयाच्या रकमा संशयास्पदरित्या अदा करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
खालील प्रमाणे रकमा संशयास्पदरित्या अदा केलेल्या आहेत.
१) गणपती अॅडव्हाटायझर : २३,४९,२५४/-
२) हर्बल पेस्ट कंट्रोल : ३०,२६,३०८/-
३) इंटेल इलेक्ट्रॉनिक्स : २०,५५,७७६/-
४) स्वामिनी इन्वेस्टीगेशन अँड सर्व्हिसेस : २८,९५,४७९/-
५) श्रीराम युनायटेड सर्व्हिसेस : १०,९५,५१०/-
६) सेल्फ चेक : ७२,५०,१६५ /-
एकूण रक्कम : १,८६,७२,४९२
ठेवीदारांना पैसे नंतर दिले जातील ; सांखलाचे शपथपत्र
पोलीस तपासानुसार महावीर जैन याने संशयित आरोपी कंडारेच्या काळातील अपहार उघड होऊ नये म्हणून खोटे दिशाभूल करणारे लेखापरिक्षण करुन अपहारास खतपाणी घातले. तर संशयित आरोपी धरम सांखलाने आपल्या शपथपत्रात स्पष्टपणे कबूल केलेय की, ठेवीदारांना पैसे नंतर दिले जातील. यावरुन त्याने ठेवीदारांने पैसेच दिले नाही, ही बाब स्पष्ट होते. याचा उल्लेख महावीर जैनने आपल्या लेखापरिक्षणात जाणीवपूर्वक घेतलेला नाही. यासर्व बाबी पूर्वनियोजित कटाचा भाग होत्या. मालकीच्या मालमत्ता लिलावाद्वारे विकण्यासाठी कुणाल शहा या आरोपीने पतसंस्थेच्या मालकीच्या www.bhronline.co.in वेबसाईट बनविली. याचे सर्व पासवर्ड, अॅक्सेस कोड/पासवर्ड हे कुणाल शहाकडे होते. त्याद्वारे त्याला कोणत्या व्यक्तीने कोणत्या मालमत्तेसाठी किती रक्कमेचे टेंडर भरले हे कळत होते. व हिच माहिती जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, सुनिल झंवर, महावीर जैन यांना सुध्दा ते गुप्त कटाचे सदस्य असल्याने कळत होती. महावीर जैन याच्या कार्यालय झडतीमध्ये संशयित आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे व इतरांशी संबंधीत पुरावे मिळून आले आहेत. यावरुन महावीर जैन व त्याचे इतर साथीदार यांनी संस्थेचे महत्त्वाची मूळ कागदपत्रे संशयित आरोपीच्या कार्यालयात आणून संगनमताने कट रचून केल्याचे गुन्हा निष्पन्न होत आहे. महावीर जैन यांनी त्याचा ऑडिट रिपोर्ट दि. १८/०३/२०१९ रोजी दाखल केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
कंडारेला १४७ तर सुजित वाणीला ८२ फोन कॉल
लेखापरिक्षण केल्याचा केवळ देखावा निर्माण करुन कोणतेही फॉरेन्सिक ऑडिट केलेले नाही. केवळ कंडारेच्या काळातील अपहारात स्वतः समाविष्ट असल्याने अपहार उघड होऊ नये म्हणून खोटे शेरे नमूद केलेले आहेत. रिपोर्ट दाखल केल्यानंतर दि.१८/०१/२०२० ते दि. ४/१२/२०२० पर्यत कंडारे यांस १४७ कॉल केले आहेत. तसेच याच कालावधीत संशयित आरोपी सुजित वाणी यांस ८२ कॉल केलेले आहेत. यावरून संशयित आरोपी एकमेकांच्या सतत संपर्कात असल्याचे निष्पण्ण होत असल्याचेही पोलीस तपासात समोर आलेले आहे.
विजय वाघमारे (9284058683)
















