जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्याचे धागेदोरे नाशिक येथील वॉटर ग्रेसचा ठेका, मांजरपाडा आणि समृद्धी योजनेतील वाहन पुरवठ्याचा ठेक्याच्या दिशेने गेला आहे. परंतू आता सुनील झंवरचे जळगावातील भागीदार आणि विशेषतः महापालिकेतील वॉटर ग्रेसचा ठेका आणि त्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक महापालिकेत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या वृत्तामुळे पालिकेच्या वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रमुख संशयित उद्योजक सुनील झंवर यांच्या रमेश ड्रायव्हींग स्कूलच्या कार्यालयात महापालिकेने दिलेल्या शहर स्वच्छतेचा ठेका दिलेली वॉटर ग्रेस कंपनीची कागदपत्र सापडली होती. त्यानंतर झंवर यांनी नाशिक मधील विविध कामांच्या ठेक्यांसह अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे का?, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. बीएचआर घोटाळ्याचा पैसा झंवर यांनी बोरा नामक व्यक्तीच्या माध्यमातून नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये गुंतवल्याचा संशय पोलिसांना असून लवकरच पथकाकडून नाशिक महापालिकेतील साडेतीन वर्षातील कंत्राटांची तपासणी होणार असल्याचेही वृत्त समोर आले आहे होते.
जळगाव महापालिका रडारवर !
सुनील झंवर यांच्या रमेश ड्रायव्हींग स्कूलच्या कार्यालयात महापालिकेने दिलेल्या शहर स्वच्छतेचा ठेका दिलेली वॉटर ग्रेस कंपनीची कागदपत्र सापडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पालिकेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी वॉटर ग्रेस कंपनी सत्ताधारी नगरसेवकांना १५ हजार रुपये प्रति महिना देत असल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे पोलिसांना रमेश ड्रायव्हींग स्कूलच्या कार्यालयात एक डायरी सापडली. त्यात प्रत्येक नगरसेवकाचे शॉर्टकट नाव लिहिले असून दिलेल्या पैशांचा हिशोब असल्याचे कळते. नगरसेवक, ठेकेदार असा कुठलाही थेट महापालिकेशी संबंध नसल्यामुळे वॉटर ग्रेस कंपनी कागदपत्र झंवरच्या कार्यालयात सापडतात कशी?, या एका प्रश्नाने पोलीस तपासाची दिशा जळगाव महापालिकडे येऊन ठेपली असल्याचे कळते. एवढेच नव्हे तर यातील गुंतवणूक ‘बीएचआर’ घोटाळ्याच्या पैशातून झाली आहे का?, याची प्रामुख्याने चौकशी होणार असल्याचेही कळते. दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी जळगाव महापालिका बरखास्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यादृष्टीनेही याकडे बघितले जात होते.