जळगाव (प्रतिनिधी) शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट कॉ ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीतील अपहार,फसवणूक तसेच पाच वर्षांपासून अवसायकाच्या नेमणुकीच्या काळात झालेला अपहारासह ‘बीएचआर’च्या करोडोच्या मालमत्तेची कवडीमोल दराने खरेदी करणारे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनासाठी १३६ जणांचे पथक शुक्रवारी सकाळी ७ जळगावात धडकले आहे.
सकाळी सात वाजता अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या शिवाजी नगरातील घरी पथक धडकले. उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी तेथे घरझडती घेतली. तसेच संस्थेच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात देखील पथक दाखल झाले आहे. येथे ४५ जणांच्या पथकाने चौकशीचे सूत्र हाती घेतले. त्याशिवाय उद्योजक सुनील झंवर, पतसंस्था ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे आदींच्या निवासस्थानी देखील तपासणीसह झाडाझडती सुरु आहे. ‘बीएचआर’च्या अपहार प्रकरणी राज्यभरात चेअरमनसह गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यानतंर या संस्थेवर पाच वर्षांपासून अवसायकाची नेमणूक करण्यात आली आहे. या काळात झालेल्या गैरव्यवहाराच्या तक्रारीवरुन आज शुक्रवारी पूणे येथिल आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवसयकासह, कर्जदार, ठेवीदार संघटनाचे पदाधिकारी व संस्थेच्या जागा लिलावात घेणाऱ्या उद्योजकांकडे छापे टाकले. बीएचआरमधील फसवणूक तसेच अपहाराशी संबंधितांकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून चौकशी सुरु आहे. त्यात प्रामुख्याने बीएचआर संस्थेत झालेला अपहार, गुंतवणूकदारांची थकीत ठेवी न देणे, त्याशिवाय संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल दराने झालेली विक्री याची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाल्याचे समजते.