भुसावळ (प्रतिनिधी) येथील महिलेची 60 लाख 70 हजार रुपये घेऊन गाळे खरेदी न देता फसवणूक केल्याप्रकरणी अनिल छबिलदास चौधरी यांच्यावर जानेवारी 2021 मध्ये फौजदारी कलम 420, 504, 506 अन्वये भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणाच्या जामीन अर्जावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलली गेली आहे.यामुळे 22 महिन्यानंतरही अनिल चौधरींना अंतिम जामीनच्या रुपात दिलासा मिळालेला नाहीय.
महिलेच्या फसवणूक प्रकरणी प्रकरणात अनिल चौधरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज भुसावळ सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला होता. त्यानंतर अनिल चौधरी यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने महिलेकडून घेतलेली फसवणुकीची संपूर्ण रक्कम रुपये 60 लाख 70 हजार रुपये दिवाणी न्यायालयात भरावे. त्यानंतरच तुमच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येईल असे आदेश दिले. त्यानुसार अनिल चौधरी यांनी भुसावळ येथील दिवाणी न्यायालयात सदरची संपूर्ण रक्कम भरली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते.
सदर जामीन अर्जावरील सुनावणी दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात झाली. सदर प्रकरणातील दिवाणी दाव्याचा निकाल महिलेच्या बाजूने लागला असून त्यानुसार दिवाणी न्यायालयाने श्री.चौधरी यांना गाळे खरेदी करून देण्याचे आदेश दिलेले आहे. या प्रकरणी अपील दाखल केलेले असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. याकामी पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात घ्यावी, असे आदेश दिले. त्यामुळे चौधरी यांना महिलेच्या फसवणूक प्रकरणी अंतिम जामीन 22 महिन्यानंतर देखील मिळाला नाही. सदर प्रकरणाची सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या सुनावणीत अनिल चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला जातो का? की, त्यांना जामीन मिळतो यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, दुपारपासून संपर्क साधूनही अनिल चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. संपर्क झाल्यावर त्यांची प्रतिक्रिया अपडेट केला जाईल.