नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना लसीकरण अभियानाला देशभरात आजपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात तीन कोटी जणांना कोरोना लस दिली जाणार आहे. कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला असला, तरी लसींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकने मोठी घोषणा करत कोरोना लसीचा दुष्परिणाम आढळून आल्यास नुकसानभरपाई दिली जाईल, असे जाहीर केले आहे.
जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरणाला भारतात आजपासून सुरुवात झाली. भारतात या लसीकरणासाठी सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आजच्या लसीकरणादरम्यान काही केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या लसीला विरोध झाल्याचे दिसून आले. यापार्श्वभूमीवर कोव्हॅक्सिन लस निर्मिती कंपनी भारत बायोटेकने घोषणा केली की, या लसीचे जर काही साईड इफेक्ट्स जाणवले तर कंपनी याची नुकसान भरपाई देईन. कोव्हॅक्सिनला भारत सरकारकडून ५५ लाख डोसची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने एका पत्राद्वारे ही घोषणा करताना म्हटलं की, “कोणत्याही प्रतिकूल किंवा गंभीर प्रतिकूल घटनेदरम्यान सरकारच्यावतीनं अधिकृत केंद्र आणि रुग्णालयांमध्ये चिकित्सिक स्वरुपात मान्यता प्राप्त मानकांनुसार, उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. जर लसीमुळे साईड इफेक्ट झाला तर कंपनीकडून याची भरपाई देण्यात येईल.” कोरोना लस दिल्या जाणाऱ्या लाभार्थ्याला एका सहमती पत्रावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. कोरोना लसीचे दुष्परिणाम दिसल्यास गंभीर स्थितीत लाभार्थ्याला नुकसानभरपाई दिली जाईल, असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले. कोव्हॅक्सिन कोरोना लस घेतल्यानंतर लाभार्थ्याला आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवल्यास त्यावर सरकारी रुग्णालयात उपचार केले जातील. कोव्हॅक्सिन कोरोना लस टोचून घेतल्यानंतर काही गंभीर आजार किंवा स्थिती निर्माण झाल्यास नुकसानभरपाई दिली जाणार आहे. मात्र, कोव्हॅक्सिन कोरोना लसीमुळेच लाभार्थ्याला आरोग्याची समस्या उद्भवली आहे, हे सिद्ध झाले पाहिजे, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनने कोविड-१९ लसीविरोधात एंटीडोट उत्पन्न करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिनच्या प्रभावीपणाची निश्चितता होणे अजून बाकी आहे. कारण, या लसीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अजूनही सुरु आहे. कोरोना लस घेतल्यानंतर लाभार्थ्याने कोरोना संसर्गाशी निगडीत प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे. तसेच कोरोनासंबंधातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे, असे सहमती पत्रात नमूद करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल क्षमतेविषयी माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा आढावा घेतला जात असल्याचे भारत बायोटेककडून सांगण्यात आले.