मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, किराणा सामान खरेदीच्या नावावर रिकामे फिरणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्यातील किराणा दुकानं सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत ऑक्सिजनच्या मागणीवरही चर्चा झाली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
याशिवाय पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.