भुसावळ (प्रतिनिधी) विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक यंत्रणेने शहराच्या तीन बाजूला सुरू केलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या नाकाबंदीत शहरात सात ठिकणी वाहनांची तपासणी करीत तब्बल 11 लाख 89 हजार 360 रुपयांची रोकड आणि चांदी जप्त केल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान चार तासातच ही कारवाई झाली.
पंचनामा करीत रोकड जप्त
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने यावल नाक्यावर, जळगाव रोडवर आणि बोहर्डी फाट्यावर निवडणूक यंत्रणेने स्थिर सर्व्हेक्षण पथकांची नियुक्ती केली आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे, व्हीडीओ चित्रीकरण करीत असलेला व्हीडीओग्राफर, पोलिस व कर्मचारी नियुक्त आहे. या पथकांच्या माध्यमातून येणार्या -जाणार्या वाहनांची तपासणी केली जात आहे. यामुळे वाहन धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सुध्दा या पथकाद्वारे आणि पोलिसांच्या नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात असतांना त्यात पथकातील सदस्यांना रोकड मिळाली. यामुळे पथकातील सदस्यांनी रितसर पंचनामा करून वाहनातून ताब्यात घेतलेली रक्कम व पंचनामा हा प्रांताधिकारी कार्यालयात जमा केला. यामुळे प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी संध्याकाळी पथकातील सदस्यांनी रक्कम व पंचनामा जमा करण्यास गर्दी केली होती.
पोलिसांची नाकाबंदी
शहरात विविध भागात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलीस नाकाबंदीत वाहनांची कसून तपासणी करीत होते. जामनेर रोड, बसस्थानक, यावल रोड येथे शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले व वाहतूक शाखेचे कर्मचारी हे थांबून वाहनाची तपासणी करीत होते. ही तपासणी रात्रीपर्यत सुरू होती.