अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत ही ३०० कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो ठाण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
द्वारकाचे एसपी सुनील जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका शहरातील खंभलिया महामार्गावरील आराधना धामजवळून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या बॅगेत ड्रग्ज होते. तपासणीत ६६ किलो ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले. त्याची बाजारातील किंमत सुमारे ३५० कोटी रुपये आहे. मात्र, आरोपींनी अमली पदार्थांचा पुरवठा कुठून केला, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र, पाकिस्तानामधून हे ड्रग्ज सागरीमार्गे भारतात आणले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे आम्ही सज्जाद याला अटक केली. त्याच्याकडील बॅगमधून १९ पॅकेट्स जप्त करण्यात आली आहे. तक्यामध्ये ११.४८३ किलोग्रॅम हेरॉईन आणि ६.१६८ किलोग्रॅम मेथामेफटामाइन आढळून आले आहे. तर इतर दोघांकडून १७.६५ किलोग्रॅम अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सज्जाद हा ठाण्यातील मुंब्रा परिसरातील भाजी विक्रेता असून तो तीन दिवसांपूर्वी अंमली पदार्थांचा साठा घेण्यासाठी येथे आला होता असंही पोलिसांनी सांगितले.