मुंबई (वृत्तसंस्था) गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला, ही चर्चा माझ्यासमोर झाली. महाजन यांना तर मोक्का लावण्याची तयारी केली होती. त्याचा मी साक्षीदार आहे, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
आम्ही चहापानाला गेलो तर महाराष्ट्रद्रोह झाला असता, या विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी शिंदे म्हणाले की, ‘मविआ सरकारच्या काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला आत घाला, ही चर्चा माझ्यासमोर झाली. महाजन यांना तर मोक्का लावण्याची तयारी केली होती. त्याचा मी साक्षीदार आहे; पण त्यावेळी मी काय म्हणालो, हे आज सांगणार नाही, पुढे योग्य वेळी सांगेन,’ असाही खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. दरम्यान, यावर आता गिरीश महाजन आणि फडणवीस काय प्रतिक्रिया देतात?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून त्यांची मानसिकता दिसून आली. मला त्यांना सांगायचे आहे की, दाऊदची बहीण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला, त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतला नाही. बरे झाले, अशा राष्ट्रद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली, असा टोला त्यांनी लगावला.