पुणे (वृत्तसंस्था) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी तेजस मोरे नावाच्या व्यक्तीने छुप्या कॅमेऱ्याने आपले व्हिडीओ केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री तक्रार दाखल केली आहे.
प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून गोपनीयता भंग, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा यांचा भंग केल्याने गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार त्यांनी नोंदवली आहे. प्रवीण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये केलेलं स्टिंग ऑपरेशन हे तेजस मोरे यांनी केल्याचा चव्हाण यांनी आरोप केला आहे. याआधी तेजस मोरे यांनी म्हटलं होतं की, आपण कोणालाही भेटलो नसून माझं कुठलंही राजकीय संबंध नाही. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सादर केलेले स्टिंग ऑपरेशनचे हे तेजस मोरेने सुपारी घेऊन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता.
तसेच तेजस मोरेच्या बाबतचे सगळे पुरावे आपल्याकडे असून, त्याने मला अनेक वेळा ए सी, स्मार्ट टीव्ही लावायचा आग्रह धरला होता. त्यामुळे तेजस मोरेला आपण येऊ नको असे वारंवार सांगत होतो. परंतु, आपल्याला फसवण्याचा त्याचा उद्देश असल्याने तो वारंवार माझ्याकडे येत असल्याचेही चव्हाण म्हणाले होते. एवढेच काय तर, माझ्या ऑफिसमधून मोबाईल, लॅपटॉप बॅग चोरीला गेल्याचे सांगत मोरे आठवड्यातून दोन ते तीन वेळा कार्यालयात येत असत असे ते म्हणाले होते. दरम्यान, प्रवीण चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होईल का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.