जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर प्रकरणात (Bhr Scam) जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात स्थापन एसआयटीचे (SIT) पथक संशयित आरोपीच्या शोधार्थ आज चाळीसगावात पोहचल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
बीएचआरच्या दाखल (Bhr Scam) गुन्ह्यात झंवर परिवाराला मदतीच्या बदल्यात कोट्यावधीची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण (Ad.Pravin Chavhan), शेखर सोनाळकर यांच्यासह चाळीसगावच्या मद्य व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सूरज सुनील झंवर (३२, रा. साई बंगला, सुहास कॉलनी, जळगाव) यांनी याबाबत डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये १ कोटी २० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार सुरुवातीला डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अॅड. प्रवीण पंडित चव्हाण (रा. सुमंगल अपार्टमेंट, मोदीबाग, शिवाजीनगर, पुणे), शेखर मधुकर सोनाळकर (रा. नयनतारा अपार्टमेंट जळगाव), उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव) हे संशयित आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १६६ २१३, ३८४, ३८५, ३८६, ३८८, ५०६, ३४, १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
‘एसआयटी’ पथक पोहचले चाळीसगावात !
तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध दाखल खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाचे गठण करण्यात आले आहे. या पथकात दोन अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक एस. जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी पथक तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या गुन्ह्यातील संशयित उदय पवार याच्या शोधार्थ एसआयटीचे पथक आज चाळीसगावात पोहचले होते. परंतू संशयित मिळून आला नसल्याचे कळते. परंतू पथक संशयितांचा कसून शोध घेत आहे. विशेष तपास पथकात पोलिस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, हे. कॉ. विजय पाटील, नरेंद्र वारुळे, नाईक जीवन पाटील व मनोज सुरवाडे यांचा समावेश आहे. आज पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे आपल्या कर्मचाऱ्यांसह चाळीसगावात जाऊन आल्याचे कळते.
मूळ फिर्यादी सुरज झंवरचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू !
या गुन्ह्याचे मूळ फिर्यादी सुरज झंवर हे आहेत. पोलीस मुख्यालयातील एसआयटीच्या कार्यालयात आज सुरज झंवर यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरु होते. त्यांनी नेमका काय जबाब नोंदवला याची माहिती मिळू शकली नाही. परंतू पुढील काही दिवसात तपासाला गती मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पथकाने गेल्या आठवड्यात फिर्यादी सुरज झंवर यांचे वडील सुनील झंवर नोंदविला. तसेच झंवर यांच्याकडून काही पुराव्यांसह दस्तऐवजही एसआयटीने ताब्यात घेतल्याचे कळते.
अॅड. प्रवीण चव्हाण यांचा अंतरिम अटकपूर्व फेटाळलेला
बीएचआर गैरव्यवहारातील संशयिताच्या जामीन अर्जाला विरोध न करण्यासाठी १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात संशयित असलेले तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने जानेवारी महिन्यात फेटाळून लावलेला आहे.