धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध समस्यांबाबत आज भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. यासाठी भाजपने आज चक्क सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन केले.
शहरातील सर्व शौचालये नगरपालिकेला हस्तांतरीत करण्याची मागणी
शहरातील रामदेवजी बाबा नगर,गणेश ऑटो सर्व्हिस व टिळक तलाव येथील शौचालय दुरुस्तीसाठी अनेक दिवसांपासून बंद आहेत. तसेच मोठा माळी वाडा ,धरणीनाला, पाताळ नगरी जवळील शौचालयाचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्याही ठिकाणी शौचास जागा नाही. त्यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन त्रास सहन करावा लागत आहे. आता तर पावसाळ्याचे दिवस असल्याने महिला व पुरुषांना खूपच त्रास होत असून उघड्यावर शौचास बसल्यामुळे रोगराई वाढून नागरीकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. तरी सर्व बाबींचा विचार करून शहरातील सर्व शौचालये नगरपालिकेत हस्तांतरीत करण्यात यावीत, म्हणजे ते नागरिकांना वापरण्यासाठी खुले करण्यात येतील व होणाऱ्या गैरसोय व त्रासापासून नागरीकांची सुटका होईल.
शहरातील खड्डे त्वरीत दुरुस्त करून साईड पट्ट्या तयार करण्याची मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत दुरुस्त करण्यात यावेत व कित्येक महिन्यापासून सुरू असलेला रस्त्याच्या दुतर्फा मुरुम टाकून साईड पट्ट्या तयार कराव्यात. त्याचबरोबर रस्त्याच्या मधोमध अपूर्ण अवस्थेतील रखडलेले डिव्हाडरचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या दालनातून उठणार नाही परंतु साहेबांनी 5 ते 6 दिवसात सर्व कामे पूर्ण करतो असे विश्वास दर्शक तोंडी आश्वासन दिले म्हणून त्यांच्या दालनातून ठिय्या आंदोलन संपवून निवेदन देण्यात आले. तरी देखील वरील सर्व कामे 5 ते 7 दिवसात पूर्ण न झाल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी पाटील साहेब व सपकाळे साहेबांना देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक कडुअप्पा बयास,भालचंद्र माळी,आबा पाटील,सुनिल चौधरी,योगेश ठाकरे,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर,अनिल महाजन,सचिन पाटील,वासुदेव महाजन,जुलाल भोई, युवा मोर्चा चे भूषण कंखरे,विशाल महाजन,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.