नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपने देशाची राज्यघटना आणि आरक्षण संपुष्टात आणण्याचे स्वप्न पाहणे सोडून दिले पाहिजे. कारण आपला पक्ष आणि देशातील कोट्यवधी लोक असे होऊ देणार नाहीत, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर तोफ डागली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी – दिल्लीतील मेट्रोतून प्रवास करत त्यांनी लोकांशी संवाददेखील साधला.
सहाव्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिल्लीत विविध ठिकाणी सभा घेत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल चढविला. उत्तर पूर्व दिल्लीतील उमेदवार कन्हैया कुमार आणि उत्तर पश्चिम दिल्लीतील उमेदवार उदित राज यांच्या प्रचारार्थ बोलताना त्यांनी राज्यघटना व आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र डागले. तसेच भाजप महिलांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानत असल्याचा आरोप केला. आरएसएसदेखील आपल्या शाखांमध्ये महिलांना प्रवेश देत नसल्याची टीका त्यांनी केली. भाजपला राज्यघटना संपुष्टात आणायची असल्याचा आरोप लावत त्यांनी ही निवडणूक राज्यघटना वाचविण्यासाठी असल्याचे म्हटले. केंद्रात विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आले तर सैन्यभरतीसाठीची ‘अग्निपथ’ योजना संपुष्टात आणली जाईल. कारण ही योजना सैन्य आणि देशभक्तीविरोधात आहे, असे राहुल गांधी म्हणाले. एका सैनिकाला शहिदाचा दर्जा आणि पेन्शन मिळेल; पण ‘अग्निपथ’ मधील अग्निवीर म्हणून भरती होणाऱ्याला शहिदाचा दर्जा मिळणार नाही. पेन्शन आणि सामाजिक सुरक्षादेखील मिळणार नाही. त्यामुळे आम्ही योजना कचराकुंडीत टाकणार आहोत.
मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे इंजिन बंद पाडले; परंतु आमचे सरकार आल्यानंतर गरीब आणि युवकांना आर्थिक मदत करत इंजिन पुन्हा सुरू केले जाईल, असे ते म्हणाले. मोदी सरकारला राज्यघटना संपुष्टात आणायची आहे. भाजप नेते उघडपणे राज्यघटना बदलण्याची भाषा बोलत आहेत; पण भाजप व आरएसएसच्या लोकांनी असे स्वप्न पाहू नये. कारण देशातील कोट्यवधी लोक आणि आपला पक्ष असे होऊ देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान मुलाखतीमध्ये आपला जन्म जैविक नाही तर देवाने मला मोहिमेसाठी पाठविल्याचे म्हणत आहेत. जर देवाने त्यांना पाठविले आहे तर कोरोना काळात त्यांनी लोकांना ‘थाळी वाजविण्यास’ का सांगितले, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. आपला पक्ष सत्तेत आला तर जवळपास ३० लाख सरकारी पदे भरण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसने दिलेल्या पाच ‘गॅरंटी’चादेखील उल्लेख केला