नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांशी संबंधित एक मोठी बातमी समोर आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीला भाजपकडून तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीनं निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून, भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मागितलंय. पीएम मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांचा भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
सोनल मोदी पंतप्रधान मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांची मुलगी आहे. त्यांनी अहमदाबाद महापालिका निवडणुकीसाठी बोडकदेव प्रभागातून भाजपचं तिकीट मागितल्याचं सांगितलं जात आहे. ४० वर्षीय सोनल मोदी या गृहिणी असून त्या अहमदाबादच्या जोधपूर येथे राहतात. सोनम मोदी यांना भाजप तिकीट देणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.
प्रल्हाद मोदी म्हणतात; तिचे काका देशाचे पंतप्रधान, त्यामुळे निवडणुकीत मदतच होईल
“माझी मुलगी लोकशाहीप्रधान देशाची नागरिक आहे. तिला स्वत:चा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तिचे काका देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे निवडणुकीत मदतच होईल. नेरंद्रभाई यांना पक्षात मोठा मान आहे. तो मान माझ्या मुलीलाही मिळेल असा विश्वास आहे”, असं सोनम मोदी यांचे वडील प्रल्हाद मोदी म्हणाले. दरम्यान, निवडणुकीचं तिकीट मिळविण्यासाठी लागणाऱ्या पात्रतेत माझी मुलगी बसत असेल तर तिला नक्की तिकीट मिळेल, असंही ते म्हणाले.
गुजरातमध्ये स्थानिक पातळीवर निवडणुका २१ आणि २८ फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यात होणार
गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी २१ आणि २८ फेब्रुवारी असं दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा निकाल २३ फेब्रुवारी रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये एकूण ६ महापालिकांसाठीची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होईल. तर २८ फेब्रुवारी रोजी राज्यातील नगरपालिका, जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीसाठीचं मतदान होणार आहे.