धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून स्वयंघोषित नेता काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेत चमकोगिरी करण्यासाठी सतत धरणगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्र अर्थात फिल्टर प्लांटची पाहणी करून लवकरच धरणगावकरांना शुद्ध आणि वेळेवर पाणी पुरवठा होण्याची बतावणी करत असतो. परंतु भाजपचे मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष टोनी महाजन पालिका प्रशासनाच्या वितरण व्यवस्थेतील मुख्य समस्येवर नेमके बोट ठेवण्याचे धाडस दाखवत पालिका प्रशासनासह चमकोगिरी करणाऱ्यांचा अक्षरशः बाजार उठवला आहे.
टोनी महाजन यांनी देखील नुकतीच धरणगाव जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये तीन फुटापर्यंत गाळ असल्याचे धक्कादायक चित्र दिसले. त्यांनी याबाबतचा लागलीच व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल केला. आपल्या पोस्टमध्ये टोनी महाजन यांनी म्हटले आहे की, नामदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या कार्यकाळात कोट्यावधीचा निधी धरणगावच्या पाणीपुरवठ्यासाठी दिला. परंतु धरणगाव पालिका प्रशासनाकडून पाणी वितरणाचे नियोजन,पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे या गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे.
आज रोजी पाण्याच्या टाकीमध्ये तीन फुटापेक्षा जास्तीचा गाळ आहे. ज्यांनी पाणी वितरणाचा ठेका घेतला आहे. त्यांचे नेते सत्तेबाहेर असल्यामुळे जाणून बुजून पाणी सोडताना गावातील पाणी वितरणात दुजाभाव केला जातो. एकंदरीत नगरपालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे गावातील जनतेला वेठीस धरण्याचे कुणाचे षडयंत्र तर नाही ना?, अशी शंका आता नागरिक व्यक्त करीत असल्याचेही श्री. महाजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एक-दोन भावी नगराध्यक्ष सतत धरणगावच्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत असतात आणि प्रत्येक वेळी लवकरच पाणी वेळेवरील शुद्ध होईल, अशी धरणगावकरांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून थाप मारत असतात. परंतु नेमक्या समस्येवर कधीही बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत. परंतु भाजपचे टोनी महाजन यांनी नेमक्या समस्येवर बोट ठेवण्याचे धाडस दाखवत चमकोगिरी करणाऱ्यांसह पालिका प्रशासनाचा अक्षरशः बाजार उठवला आहे.