भुसावळ (प्रतिनिधी) आपत्कालीन परिस्थिती रेल्वे थांबविण्यासाठी असलेली साखळी अनावश्यक कारणासाठी ओढून रेल्वेचा खोळंबा केल्याप्रकरणी ७९३ व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून तब्बल पावणेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, संकटकालीन साखळी ओढण्याच्या घटनांमुळे १९७ मेल अथवा एक्स्प्रेस गाड्यांना उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
संकटकालीन साखळी ओढण्याच्या घटनांवर मध्य रेल्वेतर्फे लक्ष ठेवले जात असून, एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या आठ महिन्यांत मध्य रेल्वेने एकूण ७९३ व्यक्तींविरुद्ध संकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचे गुन्हे नोंदविले आहेत. त्यांच्याकडून २.७२ लाख रुपयांचा दंड वसूल केला. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वे विभागात विनाकारण संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे १०७५ गाड्या उशिराने धावल्या आहेत.
यात मुंबई विभागातील ३४४ मेल-एक्स्प्रेस, भुसावळ विभागातील ३५५, नागपूर विभागात २४१, पुणे विभागात ९६ आणि सोलापूर विभागात ३९ गाड्या उशिराने धावल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात मध्य रेल्वेत साखळी खेचण्याच्या घटनांमुळे एकूण १९७ गाड्या उशिराने धावल्या आणि गाड्यांचा सरासरी वक्तशीरपणा १० मिनिटांनी कमी झाला, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. यात भुसावळ विभागात १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस या गाडीच्या साखळी ओढण्याचे प्रकार नाशिक, खंडवा आणि बऱ्हाणपूर या स्थानकादरम्यान अधिक असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.