बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनूर बुद्रुक येथील सचिन प्रकाश पाटील (वय 36) या शेतकऱ्याने दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी कुऱ्हा शिवारातील शेतात काहीतरी विषारी द्रव्य सेवन केले होते. उपचारा दरम्यान त्याची आज जीवनयात्रा संपवल्याची दु:खद घटना घडलीय.
सचिन पाटील यांनी विषारी द्रव प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची घटना नातेवाईकांना कळताच त्यांनी त्याला बोदवड येथील ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले होते. परंतू उपचार सुरू असताना आज (मंगळवार) रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास सचिन याची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालय जळगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले. तर आज दुपारी मनूर ब्रूद्रुक येथे सचिन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सचिन एकुलता मुलगा होता आणि तोच कुटुंबातील कर्ता होता. घरची अडीच एकर जमीन व दुसरीकडे शेतमजुरी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पार पाडत असतांना मागील वर्षी समाधानकारक पिक न झाल्याने त्याने शेतकर्ज थकबाकी होऊ नये म्हणून उलाढाल करण्यासाठी दुसरीकडून सुमारे ३५ हजार उसनवारी करून कर्ज नूतनीकरण करून घेतले होते. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार गेला असून पश्चात वृध्द आई, वडील, पत्नी,एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.