बोदवड (प्रतिनिधी) मुक्ताईनगर मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे यांच्यावर काल ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी तीन आरोपी पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे ताब्यात घेतले आहे. त्यात दिपक दादाराव शेजोळे (वय २२ रा. येवती ता. बोदवड) , आयुष उर्फ चिकू गणेश पालवे (वय १९), विकी ईश्वर गुरचळ (वय २५ रा. नांडगाव ता. बोदवड) या संशयितांचा समावेश आहे.
अटकेतील संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली शाईन मोटरसायकल, गावठी कट्टा व काडतुस जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेत कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरु आहे.काल ५ रोजी विनोद सोनवणे बसलेल्या गाडीवर प्रचारादरम्यान बोदवड मलकापूर रस्त्यावरील राजूर गावाजवळ दुपारी पावणेतीनच्या सुमारास तीन अज्ञात इसम गोळीबार करून फरार झाले होते.
या प्रकरणी सोनवणे यांचा वाहन चालक अजय भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.सदर आरोपींना आज दुपारी बोदवड न्यायालयात हजर केले असता आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक रेड्डी ,पोलीस उपअधीक्षक अशोक नकाते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद भोळे,उपनिरीक्षक सुजित पाटील,उपनिरीक्षक सुधाकर शेजाळे, पोलीस नाईक शशिकांत शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी तपास केला.