रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथे चार भावंडांची निर्घुण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आज मुख्य आरोपीला शास्त्रोक्त पुराव्याच्या आधारावर अटक केली आहे. महेंद्र सिताराम बारेला (वय १९, रा. केऱ्हाळा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी याबाबत आज रावेर पोलीस स्थानकात एक पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
यासंदर्भात अधिक असे की, रावेर शिवारात बोरखेडा रोड लगत शेतात दि. १६ ऑक्टोबर रोजी शेतातील शेतमजुराच्या घरात चार भावंडांचा निर्घुण खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात रावेर पोलीस स्थानकात ३०२ सह तपासादरम्यान ३७६ (अ) ४५२ लैंगिक अपराधा पासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१०, १२ अन्वये कलमांची वाढ करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.
विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, धुळे व नंदुरबार येथील तसेच एसीपी कुमार चिंता, विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, एलसीबी पीआय बापू रोहम, नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, पीएसआय मनोज वाघमारे, पीएसआय सुधाकर लहारे, पीएसआय अंगद नेमाने, पीएसआय रोहिदास औदुंबर, पीएसआय योगेश राऊत, उमेश बोरसे, पीएसआय राजेंद्र पवार, पीएसआय योगेश शिंदे यांच्यासह रावेर पोलीस, एलसीबी, सायबर सेल अशा एकूण ७० पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक नेमले होते. सदर गुन्ह्याच्या तपासात ५४ साक्षीदारांची सखोल चौकशी करून तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावकडून मयताच्या शवविच्छेदनाचा प्राप्त अहवाल, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिककडून प्राप्त अहवाल, तांत्रिक व शास्त्रीय पुराव्याच्या आधारे तसेच घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हे हत्याकांड महेंद्र सिताराम बारेला यांनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला आज पोलिसांनी अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील इतर संशयितांची चौकशी सुरू असून सदर गुन्ह्याचा तपास एसीपी कुमार चिंता हे करीत आहे.