मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील दिग्गज नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. पवार यांच्या निर्णयानंतर राज्यासह देशाच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
‘लोक माझे सांगाती’च्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं. मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. ‘जनतेचं प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे’ असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर कार्यकर्ते भावनिक झाले. तसेच त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवारांनी हा निर्णय लगेच मागे घ्यावा. त्याशिवाय आम्ही गावाकडे परत जाणार नाही, अशी भूमिका घेतली. विशेष म्हणजे हे कार्यकर्ते थेट मंचावर जमा झाल्याने तेथे काहिसा गोंधळ उडाला. यानंतर विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार संतापलेले पाहायला मिळाले.
मंचावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर अजित पवार म्हणाले की, माझी विनंती आहे की, सगळ्यांनी खाली खुर्च्यांवर बसून घ्यावं. मात्र, यानंतरही कार्यकर्ते घोषणा देत होते आणि शरद पवारांनी लगेच निर्णय मागे घ्यावा, अशी आक्रमक मागणी करत होते. यावर अजित पवार संतापले. ते आक्रमक कार्यकर्त्याला उद्देशून म्हणाले, “ये गप रे, तुलाच फार कळतं का? सगळ्यांनी खुर्च्यांवर बसून घ्या. यावर शरद पवार बोलतील. तुम्ही बसून घ्या, असेही म्हणाले. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांनी देखील बोलावं, वडीलांना विनंती करावी, अशी विनंती केली. मात्र अजित पवारांनी माईक घेत ”सुप्रिया अजिबात बोलू नकोस..मी मोठा भाऊ म्हणून सांगतोय”, असं म्हणाले. उद्या नवीन अध्यक्ष झाला तर अडचण काय आहे? शरद पवारांनी हाक दिल्यावर सगळे एकत्र येणार आहेत. खासदारकी आमदारकी बाबत सर्व निर्णय तेच घेतील, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.