बीड (वृत्तसंस्था) भावाभावात झालेल्या वादामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने १५ हजाराच्या लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम खाजगी इसमाकडे देण्यास सांगितली. तर दुसऱ्या खाजगी इसमाने ही लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. बीड एसीबीने सापळा रचत १५ हजाराची लाच घेताना रविवारी (दि.२१) सायंकाळी खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाच मागणारा, लाच स्विकारणारा आणि लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणारा असा तिघांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिभाऊ महादेव बांगर (वय ४८ रा. पालवन चौक, बीड) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे तर बुद्धभुषण तुळशीराम वक्ते (वय २९ रा. जातेगाव, ता. गेवराई) व तात्याभाऊ दिंगबर कुचेकर (वय ३६ रा. जातेगाव) असे खाजगी इसमाचे नाव आहे. लाचखोर हरिभाऊ बांगर हा तलवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत हाता. तक्रारदार आणि त्याचा भाऊ यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणा गुन्हा दाखल न करण्यासाठी हरिभाऊ बांगर याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम बुद्धभुषण वक्तेंकडे देण्यास सांगितले. तर तात्याभाऊ कुचेकर यांनी ही लाच मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावरुन बीड एसीबीने येथील यमाई देवी मंदिर परिसरात सापळा लावला होता. लाचेची रक्कम स्विकारताना बुद्धभुषण वक्ते यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदिप आटोळे, अपर अधीक्षक मुकूंद आघाव, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनुस शेख, अंमलदार श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, भरत गारदे, अंबादास पुरी, हनुमान गोरे, सुरेश सांगळे, संतोष राठोड, स्नेहलकुमार कोरडे यांनी केली.