
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेची आणि तपास कौशल्याची प्रचिती दिली आहे. भरदिवसा घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात चोरी, घरफोडी व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पो.नि. राहुलकुमार पवार यांच्या नांगण नेतृत्वात स्थानिक गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्याचा वेगाने उलगडा केला. दरम्यान, १२ जूनला दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास येथील लक्ष्मी आंगण कॉलनीतील कुसुम एकनाथ मोकळे (वय ४२) यांच्या काही आरोपींनी अमेझॉनचे पार्सल आणल्याचा बहाणा करुन त्यांच्या घराचा दरवाजा उघडून घेतला. त्यानंतर बळजबरीने घरात प्रवेश करून महिला व लहान मुलांना धाक दाखवत एका ठिकाणी बसवून ठेवले. या वेळी एका संशयिताने बंदुकीसारख्या वस्तूचा धाक दाखवत घरात सोन्याच्या चिपा असल्याची विचारणा केली. घरातील कपाटांची झडती घेत साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत आरोपींनी घरातील रोख ७ हजार रुपये तसेच मुलाकडील सातशे रुपये असा एकूण ७ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थिती, तांत्रिक माहिती, स्थानिक सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. तपासादरम्यान १३ जूनला सातगाव डोंगरी येथील चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर (वय २१) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील, वय ३७, रा. सातगाव डोंगरी) याचाही सहभाग समोर आला. तपासात योगेश परशराम शिंदे (वय ३१, रा. शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) याचा सहभाग निष्पन्न झाला. तर, योगेश शिंदे याच्याकडून गुन्ह्यातील ७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यातील नकली पिस्तूल जप्त केले. पोलिसांच्या चौकशीतून हा संपूर्ण कट उघडकीस आला. फिर्यादींच्या घरात सोन्याच्या चिपा असल्याची माहिती गोकुळ वाघ याला मिळाली होती. त्याने ही माहिती मित्र नितीन पाटील याला दिली. नितीन पाटीलने त्याच्या परिचयातील इतर व्यक्तींना सहभागी करून गुन्ह्याचे नियोजन केले. त्यानंतर चेतन भुतेकर याला सोबत घेऊन जबरी चोरी केली. तपासात गोकुळ वाघ आणि नितीन पाटील यांनी गुन्ह्यासाठी अपप्रेरण दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
यांनी केले कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब रोहोम यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पो. नि. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, सहाय्यक फौजदार विलास पाटील, पो. कॉ. योगेश पाटील, हरीश परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम शिंपी आणि नितीन भालेराव यांनी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

















