चंद्रपूर (वृत्तसंस्था) ‘दारूड्या मुलांना मुली पटतात, मला लाईनही देत नाहीत, असे तक्रारी पत्र एका कार्यकर्त्याने थेट आमदार सुभाष धोटे यांना दिले आहे. आ. धोटे यांनी देखील या तरुणाचा शोध घेण्याचा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय.
नेमकं प्रकरण काय ?
सप्टेंबरला एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. स्थानिक आमदार सुभाष धोटे यांच्या नावाने हे पत्र होतं. ज्यात पत्राचा विषय ‘गर्लफ्रेंड न पटण्याबाबत’ असा होता. त्यात अर्जदार म्हणून भूषण जांबुवंत राठोड असे नाव होते. त्या पत्रात लिहिले आहे, की “संपूर्ण तालुक्यात भरभरून मुली आहेत. पण, मला एकही गर्लफ्रेंड नसणे ही चिंतेची बाब आहे. यामुळे माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी गडचांदूर ते राजुरा दररोज प्रवास करतो. परंतु मला एकही मुलगी पटत नाही. दारू विक्री करणाऱ्या, काळ्या-कुळ्या मुलांना मुली पटतात. हे बघून माझे मन जळते. तरी माझी विनंती आहे की आपल्या विधानसभा क्षेत्रातील युवतींना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. आमच्या सारख्यांना देखील भाव देण्यात यावा”.
विशेष म्हणजे या तरुणाने हे पत्र थेट सुभाष धोटे यांना पोस्टाद्वारे किंवा मोबाईलवर पाठविले नाही. हे पत्र व्हायरल झाल्यावर धोटे यांच्या कार्यकर्त्यानेच त्यांना हे फॉरवर्ड केलं. हा प्रकार आमदार धोटे यांना फारसा रुचला नाही. त्यांनी ह्या तरुणाला थेट भेट घेण्याचे आवाहन केले. ‘जर मी स्वतः या तरुणाला भेटलो तर त्याची अडचण जाणून घेऊ शकेन. तसेच त्याचा योग्य तोडगा काढू शकेन. यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील या तरुणाचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क करण्याचे सांगितले. मात्र, ह्या नावाचा तरुण अजून समोर आला नाही किंवा कुणाला अजून भेटला नाही. त्यामुळे हे खरे पत्र आहे की निव्वळ पब्लिसिटी स्टंट हे कळायला मार्ग नाही.