जालना (वृत्तसंस्था) हॉटेलवरील भांडी घासण्याचे काम बंद करून कामावर येण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून हॉटेल मालकाने ४० वर्षीय कामगार महिलेचा घरात घुसून चाकूने भोसकून खून केला, मौजपुरी पोलीस ठाणे हद्दीतील रामनगर साखर कारखाना परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुभिद्रा अर्जुन वैद्य (४०, रा. रामनगर साखर कारखाना) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेच्या मदतीसाठी धावलेल्या मुलासह अन्य एक जण चाकू हल्ल्यात जखमी झाला. दरम्यान, याप्रकरणी हॉटेल मालक गणेश ज्ञानदेव कातकडे (४५, रा. रामनगर साखर कारखाना) यास पोलिसांनी अटक केली आहे.
कामाला का येत नाही म्हणून वाद घातला !
रामनगर साखर कारखाना परिसरातील लंका हॉटेलच्या मागे राहत असलेल्या सुभिद्रा वैद्य या मागील ८ वर्षांपासून मथुरा हॉटेलवर भांडी धुण्यासह अन्य कामे करायच्या. मागील तीन-चार महिन्यांपासून मुलांच्या आग्रहाखातर त्यांनी हॉटेलमधील काम सोडले होते. मात्र, हॉटेल मालक गणेश कातकडे हा वारंवार दारू पिऊन सुभिद्रा यांच्या घरी जाऊन कामावर परत येण्यासाठी दबाव आणत होता. शुक्रवारी गणेश कातकडे हा मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास दारू पिऊन सुभिद्रा यांच्या घरी गेला. यावेळी त्याने तू कामाला का येत नाही म्हणून वाद घातला. घराशेजारील लोकांनी समजावून सांगितल्यानंतर तो तेथून निघून गेला. दरम्यान, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कातकडे हा दारूच्या नशेत पुन्हा सुभिद्रा यांच्या घरी आला. घराचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले. दरवाजा उघडून बाहेर येताच त्याने सुभिद्रा यांच्यावर चाकूहल्ला केला.
पोटात, हातावर, छातीवर सपासप वार !
पोटात, हातावर, छातीवर सपासप वार केले. त्यामुळे सुभिद्रा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. अचानक आरडाओरडचा आवाज आल्याने झोपेत असलेला त्यांचा मुलगा सचिन वैद्य (२०) हा बाहेर आला. त्याच्यावरही कातकडे याने चाकूहल्ला केला. मदतीसाठी धावलेला सचिनचा मित्र अभिषेक (पूर्ण नाव नाही) याच्यावरही चाकूने वार केले. त्यामुळे दोघेही जखमी झाले. मोठा रक्तस्राव झाल्याने सुभिद्रा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी याबाबत मौजपुरी पोलिसांना माहिती दिली.
संशयिताला पोलिसांनी पहाटे जालना शहरातील मंठा चौफुली भागातून केली अटक !
माहिती मिळताच सहायक निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक राकेश नेटके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गणेश कातकडे यास पोलिसांनी पहाटे जालना शहरातील मंठा चौफुली भागातून अटक केली. जखमी दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मृत सुभिद्रा वैद्य यांची बहीण शीतल बबन ठोके (३१, रा. रामनगर साखर कारखाना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित गणेश कातकडे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक मिथुन घुगे अधिक तपास करत आहेत.