जळगाव(प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरट्याची दादागिरी वाढत चाललेली दिसत आहे. शहरातील रिंगरोडवर असलेल्या हाउस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज या दुकानातून चोरट्यांनी दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत १ लाख २ हजार ६५९ रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील रिंगरोड येथील दीनानाथ वाडीत राहणारे अभिषेक सुनील बाफना यांचे हाउस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज हे दुकान रिंगरोड येथे पीपल्स बँके शेजारी आहे. दिवाळीच्या धामधुमीत दि.२१ च्या रात्री ८.४५ ते दि.२३ च्या सायंकाळी ६.३० च्या दरम्यान गर्दीचा फायदा घेत १ लाख २ हजार ६५९ रुपयांचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी दुकानातून सोने आणि डायमंडचे २ मंगळसूत्र आणि २ अंगठ्या असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी अभिषेक बाफना यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहेत.