जळगाव ( प्रतिनिधी ) – मोबाईल हॅक करून बँक खात्यातून परस्पर पैसे वळवल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव येथे उघडकीस आला आहे. पाटणा येथील रहिवासी महेश ईश्वर जामदार (वय ३१) या तरुण शेतकऱ्याच्या बँक खात्यातून अज्ञात इसमाने तब्बल ५ लाख ४९ हजार ४०१ रुपये लंपास केले आहेत. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील महेश जामदार यांचे चाळीसगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. दि. २१ ते दि. २७ फेब्रुवारी दरम्यान, एका अज्ञात आरोपीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक हॅक केला. या माध्यमातून आरोपीने जामदार यांच्या बँक खात्याचा ताबा मिळवून वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांवर एकूण ५ लाख ४९ हजार रुपये ट्रान्सफर केले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जामदार यांनी तक्रार दिली. याप्रकरणी दि. १७ मार्च रोजीजळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे करत आहेत.
दोन महिन्यात दहा गुन्ह्यांची नोंद
गेल्या दोन महिन्यातच ऑनलाईन फसवणुकीचे १० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असून, त्यातुन सुमारे २ कोटींपर्यंतची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे, या एकही प्रकरणात पोलिसांना आरोपी पकडण्यात यश मिळालेले नाही.















