जळगाव (प्रतिनिधी) मतदानाच्या दिवशी मतदार केंद्रापर्यंत मतदार आले पाहिजेत. मतदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. यासाठी मतदारांमध्ये जावून त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. स्थानिक पातळीवरील विविध संघटना, समूह व विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करून मोहीमेत सहभागी करून घ्यावे. अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे दिल्या.
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या निवडणूक तयारीबाबतचा आढावा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर जिल्हाधिकारी अकुंश पिनाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर तसेच जिल्ह्यातील 11 मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय महसूल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व मतदार संघनिहाय निवडणूक निर्णय तयारीची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सादरीकरणाद्वारे मुद्देनिहाय माहिती जाणून घेतली. श्री.देशपांडे म्हणाले, मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे. यासाठी प्रशासनाने मोहीम स्वरूपात काम करावे. बीएलओ, तलाठी, कर्मचाऱ्यांचे गट तयार करून त्यांना मतदान केंद्रनिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात यावे. मतदान टक्केवारी वाढीसाठी विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात यावी. जिल्ह्यातील पुरूषांमागील महिला मतदारांची संख्या कमी आहे. ही सरासरी वाढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राला भेट दिली पाहिजे. अतिसंवेदनशील मतदान केंद्र शोधून त्याठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी.
ईव्हीएम मशीन बाबत समाज माध्यमांमध्ये फेक न्यूज, अफवा पसरविल्या जातात. तेव्हा याबाबत ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत तरूणपिढीमध्ये जाणीव जागृत करण्याचे काम प्रशासनाने करावे. मतदानाच्या दिवशी प्रसार माध्यमे व समाज माध्यमांवर चुकीचा काही प्रसार होत असल्यास त्याला तात्काळ प्रतिसाद देऊन प्रशासनाची भूमिका मांडावी. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मतदार प्रकिया सुरळीत पाडण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत श्री.देशपांडे म्हणाले की, मतदान प्रक्रियेशी संबंधित अधिकारी – कर्मचाऱ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यात यावे.प्रशिक्षणाचे छोटे – छोटे व्हिडिओ तयार करून ते प्रसारित करण्यात यावे.असे ही त्यांनी सांगितले.
मतदार यादी, मतदान केंद्रावरील सुविधा, ईव्हीएमची उपलब्धता, ईव्हीएम साठवणूक व निवडणूकीसाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता आदी बाबींचाही श्री.देशपांडे यांनी आढावा घेतला. यावेळी पोलीस विभागाने एमपीडीए तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या माहितीचे सादरीकरण केले.