मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ इमारतीजवळ गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली आहे. या कारमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य ‘अँटिलिया’ इमारत आहे. अँटिलियापासून जवळच काही अंतरावर एका स्कॉर्पियो कार उभी होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.
मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे निवासस्थान हे पेडर रोडवर आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे. तर आज दुपारी तीन वाजता या कारसंदर्भातील फोन आल्याचं कळतं. अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचं समोर आलं आहे. कारमध्ये जिलेटिनच्या २५ कांड्या असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्रालयाला संबंधित प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्रालयालाही याबाबत कळवण्यात आलं आहे. आता राज्य आणि केंद्रीय यंत्रणा या प्रकरणी तपास करणार असल्याचं कळतं. महाराष्ट्र सरकारने मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाची विचारपूस करुन सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं.
“वाहनाचा रंग घालवलेला आहे. वाहन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. स्फोटकं का ठेवली यांच्या मूळाशी आम्ही जाऊच. पण तपास सुरु असल्याने सध्यातरी भाष्य करणं चुकीचं आहे. मुकेश अंबानी यांनी घाबरण्याचं कारण नाही. गरज पडली तर अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल,” अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिली. मला या प्रकरणाची माहिती आताच मिळाली आहे. मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास गुन्हे शाखा करत आहे. लवकरच सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
विशेष म्हणजे मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झालेत. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. नरिमन पाईंटमधला हा रोड आहे. तो व्हीआयपी रोड म्हणून ओळखला जातो. त्या रस्त्यावर नेहमीच मोठा पोलीस बंदोबस्त असतो. या परिसरात ही गाडी सापडल्यानं पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेकडे याचा तपास देण्यात आलाय.
















