भुसावळ ( प्रतिनिधी ) : दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र वसाहतीत खंडणी, मारहाण व धमकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी खासगी कंत्राटदार मिलिंद गुणवंत धर्माधिकारी (वय ५१, रा. कुलकर्णी प्लॉट, भुसावळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मिलिंद धर्माधिकारी हे दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र परिसरात कंत्राटी स्वरूपात काम करतात. जवळपास ४ महिन्यांपूर्वी तसेच १४ जानेवारीला दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सम्राट बनसोडे व त्याच्या दोन साथीदारांनी औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीतील क्वार्टर (क्रमांक न्यू ई-३८/१) येथे धर्माधिकारी यांच्या असलेल्या कंपनीच्या कार्यालयात अनधिकृत प्रवेश केला. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना कामावर लावण्याच्या कारणावरून वाद घालत धर्माधिकारी यांचा रस्ता अडवला. या वेळी तिघांनी धर्माधिकारी यांना अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच मारहाण केली. यानंतर त्यांनी धर्माधिकारी यांच्याकडे २० हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे धर्माधिकारी व त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी भयभीत झाले असून औष्णिक विद्युत केंद्राच्या वसाहतीत काम करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पो.नि. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. तर आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक तयार केल्याचे समजते. दरम्यान, औष्णिक विद्युत केंद्र परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असून अशा प्रकारांना कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. तर अशा प्रकारांमुळे उद्योग व कंत्राटी कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
















