जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेचे रोकडसह दागिने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, जामनेर तालुक्यातील वाकडी येथील रहिवासी सोजरबाई चतरसिंग राजपूत (वय ५९) या सोमवारी कामानिमित्ताने जळगावात आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा गावी जाण्यासाठी त्या नवीन बसस्थानकात आल्या. याठिकाणी जामनेरकडे जाणार्या बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले ३८ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन पोत तसेच पाच हजार रुपये रोख असा ७६ हजारांचा ऐवज कुणीतरी चोरून नेला. बसमध्ये बसल्यानंतर आपले दागिने तसेच पैसे चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोजरबाई राजपूत यांनी बसमध्ये तसेच बसस्थानक परिसरात चौकशी करत शोध घेतला. मात्र मुद्देमाल मिळुन न आल्याने अखेर सायंकाळी सोजरबाई राजपूत यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल फिरोज तडवी करीत आहे.