धरणगाव (प्रतिनिधी) शहातील चोपडा रोडवरील टायर पंक्चर दुकानासमोर विक्रीसाठी ठेवलेले टायर चोरून नेताना एकाला हॉटेल व्हाईट हाऊसचे अवधेश वाजपेयी यांनी रंगेहात पडले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, इम्रान शहा याकुब शहा (वय. २६, रा. बलचपुरा, धरणगाव) यांचे चोपडा रोडवर उमा टायर पंक्चर दुकान आहे. दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ASHOK LELAND कंपनीची माल वाहु गाडी (छोटा हत्ती, क्रमांक MH १८ AA ४५५७) या वाहनात दिनेश कांतीलाल बडगुजर (रा. साई पॅलेस हॉटेलजवळ, जळगाव) आणि एक अनोळखी व्यक्ती असे दोघं जण दुकानासमोर ठेवलेले ४०७ वाहनासाठी लागणारे १६ हजार रुपये किंमतीचे ८ टायर भरुन चोरून नेण्याच्या प्रयत्नात होते. याचवेळी हॉटेल व्हाईट हाऊसचे अवधेश वाजपेयी हे घरी जाण्यासाठी निघाले. तत्पूर्वी त्यांनी आपल्या गणेश ऑटो याठिकाणी आपल्या पाळीव कुत्र्यांना पोळ्या टाकण्यासाठी थांबले. याचवेळी दोन जण समोरच्या उमा टायरच्या दुकानातून गाडीमध्ये टायर भरत असतांना दिसून आले.
यामुळे अवधेश वाजपेयी यांनी लागलीच दुकान मालक इम्रान शहाला फोन करून बोलावून घेतले. नंतर वाजपेयी यांनी दोघांना हटकत काय करताय म्हणून विचारले?,. त्यावर एका चोरट्याने तुझं काम कर… म्हणून गाडी चालवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतू वाजपेयी पुढं सरकल्यावर एका चोरट्याने त्यांच्यासोबत झटापट केली. परंतू वाजपेयी यांनी कानशिलात लावताच गाडी चालकाने पळ काढला. तर मागे टायर भरणाऱ्याने देखील उडी मारून पळून गेला. यानंतर वाजपेयी यांनी गाडीत बसलेला दिनेश बडगुजर याला पकडले. त्याने वाजपेयी यांना कटर आणि बेल्टने मारण्याचे प्रयत्न केला. परंतू वाजपेयी यांनी न घाबरता दिनेशला पकडून ठेवत पोलीस पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना फोन करून सर्व हकीगत कळवली. त्यांनी लागलीच पोलीस गाडी पाठवत चोरट्याला ताब्यात घेतले. याबाबत धरणगाव पोलिसात इम्रान शहा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून दिनेश बडगुजरला पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत. दरम्यान, चोरी सुरु असतांना दुचाकीवर दोघं जण रेकी करत असल्याचेही समोर आले आहे.