जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात खंडणीच्या गुन्ह्याचा एक नवीन पॅटर्न काही दिवसांपासून सुरु झाला आहे. तुम्ही माहिती अधिकार किंवा सामाजिक कार्यकर्ते असाल आणि समजा तुम्ही वाळू माफियांविरुद्ध तक्रार केली असेल, तर तुमच्याविरुद्ध शंभर टक्के खंडणीचा किंवा महिला अधिकारी असल्यास बोनस म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. यात माझ्यानंतर आता धरणगावाचे रामचंद्र माळी यांची भर पडली आहे, अशी संतप्त भावना माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर या दोन्ही घटनांमधील एक साम्य बाब म्हणजे दोघांविरुद्ध महसूल अधिकाऱ्यांनी तक्रारी दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे की, इंग्रज भारतावर राज्य करीत असतांना त्यांना भारतीयांच्या कुठल्याही समस्येशी देणे-घेणे नव्हते. त्यामुळे प्रत्येक अडचण, तक्रार किंवा मागणीसाठी अर्ज करावा लागायचा. मग त्यावर इंग्रज अधिकारी काय तो निर्णय घ्यायचे. परंतू भारत स्वतंत्र झाल्यानंतरही यात काहीही फरक पडलेला नाहीय. प्रत्येक गोष्टीसाठी अर्ज करावा लागतोय. खास करून महसूल विभागाशी निगडीत वाळू व्यवसायाविरुद्ध तर तक्रार करणे म्हणजे आयुष्याशी खेळण्यासारखा विषय झालाय. आजच्या घडीला जिल्ह्यात वाळू व्यवसाय म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. रोजचा लाखोचा टर्नओव्हर असल्यामुळे वाळूच्या अवैध वाहतूकीतून मिळणारा अफाट पैसा दिमतीला सरकारी यंत्रणेचा भ्रष्टाचार आणि यातून वाळू व्यवसायात वाढलेली गुन्हेगारीमुळे जिल्ह्याने अनेक संघर्ष पाहिलेली आहेत. अगदी एकमेकाच्या खुनापर्यंत वाळू माफियांनी मजल गाठली आहे. अगदी यातून खंडणीसह अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारल्याचे गुन्हे देखील दाखल आहे. याबाबत जळगावच्या उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे यांचे प्रकरण ताजेच आहे.
याचपद्धतीने मी जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर आमच्यातील संघर्ष आपण सर्वांनी बघितलाच आहे. आधी विनयभंग आणि नंतर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतू सत्य परेशान होता हैं पराजित नही. त्यामुळे आम्ही महसूलमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यानंतर मग वैशाली हिंगेची तडकाफडकी बदली करण्यात आली. वाळू माफियांच्या विरुद्ध तक्रार केल्यास दाखल होणाऱ्या खंडणीच्या गुन्ह्यात आता धरणगाव कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांची भर पडली आहे.
माझ्याविरुद्धच्या दाखल तक्रारीत जशी काही हास्यास्पद मुद्दे होती. तशीच हास्यास्पद मुद्दे रामचंद्र माळी यांच्याविरुद्धच्या तक्रारीत आहेत. मुळात वाळू माफियांविरुद्ध तक्रार करणे आता गुन्हा झालाय का?. जर असेल, तर तसा फलक महसूल विभागाने आपल्या कार्यालयाबाहेर लावायला काय हरकत आहे?. खरं म्हणजे वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध उठणारा प्रत्येक आवाज आता चिरडला जावू लागला आहे. झटपट श्रीमंत होणारा धंदा म्हणून वाळू व्यवसायाची आता ओळख निर्माण झाली आहे. यामुळे अनेक अनेक तरुण वाळू माफिया बनण्याची हौस राखून आहेत. जिल्ह्यातील वाळू वाहतुकीवर बंदी असतानांही रोज ट्रॅक्टर, ट्रक टिप्पर डंपरद्वारे खुलेआम वाळूची सर्रास वाहतूक होत असते, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. मग ते धरणगाव असो की जळगावचे निमखेडी शिवार !. डोळ्या देखत सर्वकाही सुरु असतांना तक्रारदारांचा आवाज चिरडण्याचा प्रकार आपल्या लोकशाही करता अत्यंत घातक असल्याचेही दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे.