धरणगाव (प्रतिनिधी) एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी. आर. हायस्कूल मध्ये मार्च २०२० मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावलेल्या आणि त्याबद्दल धरणगाव शिवसेना कडून पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्कूटी भेट मिळाल्याबद्दल गुणवंत विद्यार्थिनी विशाखा विजय माळी हिचा आणि तिच्या पालकांचा शाळेत भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते. तर धरणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे साहेब यांच्या हस्ते विशाखाचा सत्कार करण्यात आला. मोठा माळीवाडा परिसरात राहणाऱ्या आणि आई वडील हे भाजीपाला विकून उदरनिर्वाह करत असताना सावित्रीची लेक विशाखाने अशा प्रतिकूल परिस्थितीतही केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे घवघवीत यश मिळवून शाळेचे आणि धरणगाव शहराचे नाव रोशन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी धरणगाव शिवसेना, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, धरणगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल या सर्वांविषयी आभाराची भावना व्यक्त केली आहे. विशाखाचे यश हे निरपेक्ष आणि विना काॅपीचे असून सर्व सामान्य बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशाखा ही एक आयडॉल बनली आहे. आजही इतर कोणत्याही हुशार विद्यार्थ्यांसोबत विशाखाला पेपर लिहायला बसवले तरी विशाखा हीच उजवी ठरेल, असे डॉ. सोनवणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पी. आर. हायस्कूलचेच विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत असल्याने शाळेविषयी अपप्रचार करणार्या तोंडचोपड्यांना रोखठोक आव्हान दिले आहे. यावेळी उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, पर्यवेक्षिका आशा चंद्रकांत शिरसाठ आणि शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.